राष्ट्रीय

UP Assembly Elections : ‘चंद्रशेखर आझाद हा आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा’; असदुद्दीन ओवैसींची मोठी घोषणा, यूपीच्या राजकारणात धमाका

दलित-मुस्लिम मतांची नवी मोट; अखिलेश आणि मायावतींसमोर अस्तित्वाचे मोठे आव्हान

पुढारी वृत्तसेवा

लखनौ : लखनौ : आगामी २०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या 'सामाजिक परिवर्तन मोर्चा'चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून 'आझाद समाज पार्टी - कांशीराम'चे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्या नावाची घोषणा 'एआयएमआयएम'चे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी गुरुवारी केली.

लखनौ येथे चंद्रशेखर आझाद यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ओवैसी यांनी ही घोषणा केली. उत्तर प्रदेशात भाजपला सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्यापासून रोखणे हे या युतीचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे ओवैसी यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, उत्तर प्रदेशच्या राजकारणात उदयास आलेल्या या नव्या समीकरणामुळे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती या दोघांच्याही अडचणी वाढल्या आहेत. या नव्या दलित-मुस्लिम आघाडीमुळे सपा आणि बसपासमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, ओवैसी आणि चंद्रशेखर यांची ही जोडी संपूर्ण उत्तर प्रदेशच्या राजकारणावर प्रभाव टाकू शकते आणि यामुळे मतांचे विभाजन होणे अटळ मानले जात आहे. आता हा 'सामाजिक परिवर्तन मोर्चा' निवडणुकीत कितपत यशस्वी ठरतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

भाजपची हॅट्ट्रिक रोखण्याचा निर्धार

पत्रकारांशी संवाद साधताना ओवैसी म्हणाले की, "उत्तर प्रदेशात भाजपला तिसऱ्यांदा सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी आमची ही युती एक प्रबळ पर्याय ठरेल, असे मी आत्मविश्वासाने सांगू शकतो." ते पुढे म्हणाले की, या युतीचे मुख्य लक्ष मागासवर्गीय, दलित, शोषित आणि वंचित घटकांच्या प्रश्नांवर असेल. जात-पात न पाहता सर्व वंचित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी हा मोर्चा काम करेल. आतापर्यंत इतर राजकीय पक्षांनी या समाजाचा वापर केवळ 'व्होट बँक' म्हणूनच केला असल्याचा आरोपही ओवैसी यांनी केला.

बेरोजगारी, शिक्षण आणि शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर

राज्यातील ढासळलेली शिक्षण व्यवस्था, तरुणांमधील वाढती बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या समस्या यांसारखे महत्त्वाचे मुद्दे 'सामाजिक परिवर्तन मोर्चा' प्रभावीपणे लावून धरणार असल्याचे ओवैसी यांनी सांगितले. ते म्हणाले, "आमचे बंधू चंद्रशेखर आझाद हे 'सामाजिक परिवर्तन मोर्चा'चे प्रमुख अध्यक्ष असतील आणि उत्तर प्रदेशातील आमचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवारही असतील, याची घोषणा करताना मला अत्यंत आनंद होत आहे." या आघाडीचा विजय हा उत्तर प्रदेशातील जनतेचा विजय असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मागील उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालांचा आढावा घेतल्यास, 'एआयएमआयएम' (AIMIM) पक्ष अनेक मतदारसंघांतील निवडणुकीच्या गणितावर परिणाम करू शकतो. एआयएमआयएम समाजवादी पक्षाला, तर चंद्रशेखर यांची 'आझाद समाज पार्टी' बसपाच्या पारंपरिक मतपेढीला मोठा फटका देऊ शकते. काही प्रमाणात दलित मतदार काँग्रेसलाही मतदान करत आले आहेत, त्यावरही याचा परिणाम होऊ शकतो. ओवैसी आणि चंद्रशेखर यांची आक्रमक भूमिका यामागील प्रमुख कारण मानली जात आहे. ओवैसी यांनी मुस्लिमांच्या हक्कांचा मुद्दा उचलून धरत "मुसलमान आता केवळ सतरंज्या उचलण्याचे काम करणार नाही," असे विधान केले आहे; तर दुसरीकडे चंद्रशेखर आझाद हे दलितांच्या हक्कांसाठी खांद्याला खांदा लावून उभे राहण्याची ग्वाही देत आहेत.

कमी फरकाने निकाल लागणाऱ्या मतदारसंघांना बसणार फटका

सन २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत एआयएमआयएमने ९५ उमेदवार रिंगणात उतरवले होते. पक्षाला सरासरी ०.४९ टक्के मते मिळाली होती, जरी त्यांचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नसला तरी त्यांनी मतांवर प्रभाव पाडला होता. दुसरीकडे, आझाद समाज पार्टीने ११० जागांवर उमेदवार उभे करून ०.१३ टक्के मते मिळवली होती. मागील निवडणुकीत एआयएमआयएमला प्रति मतदारसंघ सरासरी पाच हजार मते मिळाली होती. त्यामुळे ज्या मतदारसंघांमध्ये विजयाचे आणि पराभवाचे अंतर अत्यंत कमी राहिले होते, अशा जागांवर या युतीचा निर्णायक परिणाम होऊ शकतो.

या प्रमुख मतदारसंघांवर राहणार विशेष लक्ष

दोन्ही पक्षांचे विशेष लक्ष कुंदरकी, संभल, असमोली, बिलारी, रामपूर, मेरठ, नगीना, कानपूर कॅन्ट, आझमगडमधील मेहनगर, जौनपूरमधील मछलीशहर, शाहगंज, बहराइच आणि श्रावस्ती यांसारख्या मतदारसंघांवर केंद्रित आहे. मागील निवडणुकीत या भागांत पक्षाची कामगिरी लक्षणीय राहिली होती. कुंदरकी मतदारसंघात एआयएमआयएमचे उमेदवार मो. वारिस यांना १४,२५१ मते मिळाली होती, जिथे सपा उमेदवाराने १,२५,७९२ मते मिळवून विजय नोंदवला होता आणि भाजप दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता. पक्षासाठी संभल मतदारसंघ सर्वाधिक महत्त्वाचा ठरला होता, कारण येथे एआयएमआयएमचे उमेदवार मो. मुशीर खान यांनी २१,४७० मते मिळवली होती. आगामी २०२७ च्या निवडणुकीत दलित आणि मुस्लिम मतांची मोट बांधून हे दोन्ही पक्ष नवे राजकीय समीकरण जुळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

बिहारमधील 'त्या' इशाऱ्याची पुनरावृत्ती

सन २०२५ मध्ये झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीतही असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएमने 'महाआघाडी'मध्ये (महागठबंधन) सामील होण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले होते. यासाठी त्यांनी राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांना अनेक पत्रे लिहिली आणि काँग्रेस नेत्यांच्या गाठीभेटीही घेतल्या. मात्र, महाआघाडीने ओवैसी यांचे सर्व प्रस्ताव फेटाळून लावले होते. त्यानंतर ओवैसी यांनी "आता जर भाजपचे सरकार सत्तेत आले, तर रडत बसू नका," असा इशारा दिला होता. महाआघाडीत स्थान न मिळाल्याने ओवैसी यांच्या पक्षाने चंद्रशेखर आझाद आणि स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासोबत 'तिसरी आघाडी' स्थापन करून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत एआयएमआयएमने सीमांचल भागातील ५ जागा जिंकण्यात यश मिळवले होते. विशेष म्हणजे, २०२० मध्ये निवडून आलेल्या त्यांच्या ५ आमदारांपैकी ४ आमदारांना राजदने फोडले होते; तरीही ओवैसी यांनी २०२० च्या कामगिरीची पुनरावृत्ती करत आपले वर्चस्व सिद्ध केले होते. बिहारमधील या महाआघाडीत राजद, काँग्रेस आणि डाव्या पक्षांसह इतर अनेक राजकीय पक्षांचा समावेश होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT