Crime News UP Moradabad Robbery Case
मुरादाबाद: प्रेमासाठी माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो, असं म्हणतात; पण मुरादाबादमध्ये एका लेकीने आपल्या प्रेमाखातर वडिलांच्याच घरावर दरोडा टाकल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पित्याच्या व्यवसायातील सव्वा कोटी रुपयांवर डल्ला मारणारी मुख्य सूत्रधार दुसरी तिसरी कोणी नसून त्यांची स्वतःची मुलगी अरीबा असल्याचे पोलीस तपासात समोर आले. अरीबाने आपल्या प्रियकराच्या मदतीने हा संपूर्ण कट रचला होता.
मुरादाबादमधील प्रसिद्ध पितळ व्यापारी मोहम्मद इमरान यांची मुलगी अरीबा आणि अमरोहा येथील अर्शद वारसी यांच्यात गेल्या ७-८ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, दोघांची जात वेगळी असल्याने लग्नात अडचणी येत होत्या. घरच्यांचा विरोध पत्करून नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी त्यांना मोठ्या रकमेची गरज होती. याच हव्यासापोटी अरीबाने प्रियकर अर्शद आणि त्याच्या तीन मित्रांच्या मदतीने स्वतःच्याच घरी दरोडा टाकण्याचा कट रचला.
हा दरोडा म्हणजे केवळ योगायोग नसून गेल्या महिन्याभरापासून रचलेलं एक मोठं कारस्थान होतं. अरीबाने घराची खडान् खडा माहिती प्रियकराला दिली होती. अरीबाने महिनाभरापूर्वीच घराच्या मुख्य दरवाजाची चावी चोरून अर्शदकडे सोपवली होती. ११ मे रोजी पहाटे ४ च्या सुमारास, जेव्हा संपूर्ण कुटुंब गाढ झोपेत होतं, तेव्हा अरीबाने घरातील 'डिजिटल लॉक' उघडून प्रियकरासह त्याच्या मित्रांना आत प्रवेश करून दिला. शस्त्रांचा धाक दाखवत त्यांनी संपूर्ण कुटुंबाला ओलीस ठेवले आणि कपाटातील सव्वा कोटींची रोकड लंपास केली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी जाताना सीसीटीव्हीचा DVR देखील सोबत नेला.
मुरादाबादचे एसएसपी सतपाल अंतिल यांच्या मार्गदर्शनाखाली चार पथकांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि संशयास्पद हालचालींवरून पोलिसांची सुई घरातील व्यक्तीवरच स्थिरावली. कसून चौकशी केल्यानंतर अरीबा आणि तिच्या प्रियकराचे कारस्थान उघड झाले.
पोलिसांनी रोख रक्कम ४७ लाख २४ हजार रुपये, ४ गावठी कट्टे, ५ मोबाईल आणि २ कार जप्त केली आहे. लग्न करून संसार थाटण्यासाठी पैशांची गरज असल्याने हा गुन्हा केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. अरीबा, तिचा प्रियकर अर्शद आणि त्यांच्या तीन साथीदारांना अटक करण्यात आली असून, उर्वरित रक्कम आणि फरार आरोपींचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.