UP man dead newborn file photo
राष्ट्रीय

UP News : 'साहेब, माझ्या बाळाला जिवंत करा!' बापाचा हंबरडा; नवजात बाळाचा मृतदेह पिशवीत घेऊन गाठलं जिल्हाधिकारी कार्यालय

हृदय पिळवटून टाकणारी घटना… एका आईने मृत नवजात बाळाला जिवंत करण्याची विनंती केली. वडिलांनी बाळाला बॅगेत घेऊन थेट कलेक्टर ऑफिस गाठलं. पुढे काय घडलं... वाचा सविस्तर

मोहन कारंडे

UP News :

बरेली: "माझ्या बाळाला जिवंत करा.. माझी बायको मुलाला मागतेय... मी काय सांगू?" असा मृत बाळासह वडिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयात हताश आक्रोश पाहून कार्यालयातील कर्मचारी सुन्न झाले. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी ही धक्कादायक घटना घडली. एक ३० वर्षीय व्यक्ती आपल्या नवजात मृत बाळाला बॅगेत घेऊन कार्यालयात पोहोचला आणि आपल्या बाळाला पुन्हा जिवंत करण्याची विनवणी अधिकाऱ्यांकडे करू लागला. हे हृदयद्रावक दृश्य पाहून कार्यालयातील कर्मचाऱ्यांचेही डोळे पाणावले.

विपिन गुप्ता असे या व्यक्तीचे नाव असून, त्याचा शोक अनावर झाला होता. तो मोठ्याने रडत होता. एका खासगी रुग्णालयाने पत्नी रुबी गुप्ताला चुकीचे औषध दिल्याने आपल्या बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याने केला. 'माझी पत्नी बाळाबद्दल विचारत आहे, मी तिला काय सांगू?' हे एकच वाक्य तो व्याकुळ होऊन वारंवार बोलत होता. या घटनेनंतर जिल्हाधिकारी दुर्गा शक्ती नागपाल यांनी पीडित महिलेच्या संपूर्ण वैद्यकीय खर्चाची जबाबदारी प्रशासन घेईल, असे आश्वासन दिले. सध्या महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले. प्राथमिक तपासणीत काही त्रुटी आढळल्याने तात्काळ संबंधीत रुग्णालय सील करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली असून, रुग्णालयातील सर्व रुग्णांना जिल्हा रुग्णालयात सुरक्षितपणे हलवण्यात आले आहे.

नेमकं काय घडले?

दरम्यान, गुप्ता यांनी घडलेला प्रकार सांगितला. ते म्हणाले, "गुरुवारी रात्री माझे मेहुणे आणि त्यांच्या पत्नीने रुबीला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मी काही कामानिमित्त हरिद्वारला गेलो होतो आणि मध्यरात्री मला रुबीची प्रकृती खालावत असल्याचा फोन आला. रुग्णालय प्रशासनाने नॉर्मल डिलिव्हरीसाठी १० हजार रुपये आणि एका छोट्या ऑपरेशनसाठी १२ हजार रुपयांची मागणी केली. आम्ही पैशांची जुळवाजुळव करू लागलो. आम्ही ८ हजार रुपये जमा केले आणि डॉक्टरांना उपचार सुरू करण्याची विनंती केली, पण त्यांनी नकार दिला," असा आरोप गुप्ता यांनी केला.

बाळाचा गर्भातच मृत्यू

ते पुढे म्हणाले, "आम्ही पत्नीला दुसऱ्या रुग्णालयात नेण्याची परवानगी मागितली, पण ते पैशांची मागणी करत राहिले. जेव्हा माझ्या पत्नीची प्रकृती अधिकच बिघडली, तेव्हा त्यांनी तिला रुग्णालयातून बाहेर काढून रस्त्यावर आणून सोडले. त्यानंतर आम्ही तिला दुसऱ्या खासगी रुग्णालयात नेले, मात्र तेथील डॉक्टरांनी सांगितले की, पहिल्या रुग्णालयाने दिलेल्या 'चुकीच्या औषधामुळे' बाळाचा गर्भातच मृत्यू झाला आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT