UP crime news
कानपूर: ३० लाख रुपये हुंडा दे, नाहीतर आजारी पतीला स्वतःची किडनी दान कर, असा तगादा लावत सासरच्या मंडळींनी छळ केल्याचा आरोप एका २४ वर्षीय विवाहितेने केला आहे. कानपूरमधील चकेरी भागात ही घटना घडली असून, पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कानपूरमधील चकेरी येथील या तरुणीचा विवाह जून २०२३ मध्ये लखनऊ येथील एका तरुणाशी झाला होता. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच तिला पतीच्या गंभीर आजाराची माहिती मिळाली. पतीच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या असून २०२२ पासून तो डायलिसिसवर आहे, ही बाब सासरच्यांनी लग्नापूर्वी लपवून ठेवली होती. याशिवाय, पतीचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा आरोपही पीडितेने केला आहे.
११ ऑक्टोबर २०२४ रोजी जेव्हा पीडितेने पतीच्या प्रकृतीबाबत आणि लपवून ठेवलेल्या आजाराबद्दल सासरच्यांना जाब विचारला, तेव्हापासून तिचा छळ करू लागले. सासरच्यांनी तिला मारहाण करत माहेरून ३० लाख रुपये घेऊन येण्याची मागणी केली. पैसे नसतील, तर पतीला तुझी किडनी दान कर, असा तिच्यावर दबाव टाकण्यात आला. या छळाला कंटाळून अखेर पीडितीने सासरचे घर सोडले.
"पीडितेच्या तक्रारीनुसार, सासरच्या मंडळींनी तिचे दागिनेही जबरदस्तीने काढून घेतले आहेत. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून, चौकशीअंती पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल."अजय प्रकाश मिश्रा, पोलीस ठाणे प्रभारी