Ghaziabad firing news
उत्तर प्रदेश : गाझियाबादमध्ये एका कुख्यात गुंडाला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर गावकऱ्यांनी गोळीबार आणि दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यादरम्यान गुंडांनी एका कॉन्स्टेबलच्या डोक्यात गोळ्या झाडल्या.
नहाल गावात कुख्यात गुंड कादीरला अटक करण्यासाठी नोएडा आणि मसुरी पोलिसांचे पथक गेले होते. या पथकावर गावकऱ्यांनी दगडफेक केली आणि गोळीबार केला. गौतम बुद्ध नगर येथील पोलीस स्टेशन फेज-३ मध्ये तैनात असलेले कॉन्स्टेबल सौरभ देसवाल यांना गोळ्या घालण्यात आल्या. पोलिस पथकाने त्यांना यशोदा रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सौरभच्या डोक्यात गुंडांनी गोळी घातली. मूळ शामली गावातील रहिवासी असलेल्या सौरभच्या मृत्यूची माहिती मिळताच नोएडाच्या पोलिस आयुक्त लक्ष्मी सिंह गाझियाबादला पोहोचल्या आणि परिस्थितीचा आढावा घेतला.
रविवारी संध्याकाळी नोएडा गुन्हे शाखा आणि फेज तीन पोलिस स्टेशनने कादीर उर्फ मंटर या गुंडाला पकडण्यासाठी मसुरीच्या नाहल गावात छापा टाकला. पथकाने कादिरला त्याच्या घरातून अटक केली. यादरम्यान कादिरच्या मित्रांनी आणि कुटुंबातील सदस्यांनी पोलिस पथकावर गोळीबार केला आणि दगडफेक केली. गोळीबारात कॉन्स्टेबल सौरभ देशवाल यांच्या डोक्यात गोळी लागली. या प्रकरणी गौतम बुद्ध नगर येथील पोलीस स्टेशन फेज-३ चे उपनिरीक्षक सचिन यांनी तक्रार दिली आहे. तक्रारीच्या आधारे मसुरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रामीण पोलीस उपायुक्त सुरेंद्र नाथ तिवारी यांनी सांगितले की, "२५ मे रोजी, ठाणे मसुरी येथे गौतम बुद्ध नगर येथील सौरभ नावाच्या कॉन्स्टेबलला नाहल गावाजवळ गोळी मारण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यांच्या पथकाने त्यांना रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही घटना घडली जेव्हा एक पथक नाहल येथील रहिवासी असलेल्या कादिर नावाच्या एका आरोपीला अटक करण्यासाठी आले होते. संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतर कायदेशीर कारवाई केली जात आहे."