मऊ (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी (दि. २९) मऊ येथे विविध विकासकामांचे उद्घाटन केले. यावेळी मऊच्या जनसभेला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील माफिया आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर जोरदार निशाणा साधला.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मऊ येथील सभेत माफिया आणि गुंडांना कडक इशारा दिला. ते म्हणाले की, आता राज्यात गुंडांची दादागिरी चालणार नाही. उघड्या जीपमधून फिरून, पिस्तूल दाखवून कोणालाही धमकावण्याचे दिवस आता संपले आहेत. जर कोणी सण-उत्सवांत अडथळा निर्माण केला, तर त्यांची अवस्था रावण आणि कंसासारखी होईल,’ असा इशारा त्यांनी दिला.
जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी २००५ मधील मऊ दंगलीचा संदर्भ दिला. २१ वर्षांपूर्वी याच मऊ शहराला जाळण्याचा एक अत्यंत खालच्या स्तराचा प्रयत्न झाला होता, असे ते म्हणाले. सत्तेच्या आश्रयाला असलेल्या माफियाने रामलीलेच्या आयोजनात कसा अडथळा निर्माण केला होता, येथील सुरक्षेचा प्रश्न कसा गंभीर झाला होता आणि अराजकतेचे तांडव कसे माजले होते, याची आठवण त्यांनी करून दिली. त्या काळात गरिबांना हक्काच्या सुविधा मिळत नव्हत्या, तर रामलीला, रामनवमी, जन्माष्टमी यांसारखे सण-उत्सव साजरे होऊ दिले जात नव्हते. त्या काळातील सरकारांवर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले की, समाजवादी पक्षाने तेव्हा माफिया आणि गुंडांसमोर लोटांगण घातले होते. माफियांकडे पाहून तत्कालीन नेत्यांना घाम फुटायचा आणि त्यांच्या तोंडून शब्दही फुटत नसे. काँग्रेसच्या काळात काँग्रेसचे तर समाजवादी पक्षाच्या काळात समाजवादी पक्षाचे गुंड गरिबांचे रेशन लाटायचे आणि गरीब हतबल होऊन पाहत राहायचा, अशी टीका त्यांनी केली.
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, आता कोणत्याही गुंडाची किंवा माफियाची हिंमत नाही की त्याने सण-उत्सवांमध्ये अडथळा निर्माण करावा. जर कोणी रामनवमी, शिवरात्री किंवा जन्माष्टमीसारख्या सणांच्या वेळी त्रास दिला, तर तो सण तर उत्साहात साजरा होईलच, पण असा उपद्रव करणाऱ्याला रावण आणि कंसासारखी शिक्षा नक्की मिळेल, असा इशारा त्यांनी दिला.
महिला आणि व्यापाऱ्यांच्या सुरक्षेबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी कडक इशारा दिला. ते म्हणाले की, जर कोणी महिलांच्या किंवा व्यापाऱ्यांच्या सुरक्षेशी खेळण्याचा प्रयत्न केला, तर त्याला शिक्षा करण्यासाठी यमराजच तयार असतील. आज कोणतीही भीती न बाळगता आणि न थांबता हे अभियान अविरतपणे सुरू असल्याचे सांगत, गुन्हेगारांवर वचक बसल्याचे चित्र त्यांनी मांडले.