मागील अधिवेशनानंतर ठाकूर आमदारांनीही घेतली होती अशीच बैठक
आता ब्राह्मण आमदारांच्या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
केशव प्रसाद मौर्यांनी केला वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
UP BJP Brahmin MLAs Meeting
लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर राज्यातील भाजपच्या ब्राह्मण आमदारांच्या एका खास 'बैठकी'ने राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला उधाण आले आहे. 'सहभोज'च्या नावाखाली एकत्र आलेल्या आमदारांच्या बैठकीमुळे सत्ताधारी पक्षात सर्व काही आलबेल आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, मागील अधिवेशनात ठाकूर आमदारांच्या अशाच 'कुटुंब' बैठकीची चर्चा झाली होती.
भाजपच्या ब्राह्मण आमदारांनी घेतलेल्या खास बैठकीत उपस्थित असलेले अनिल त्रिपाठी यांनी सांगितले की, संबंधित बैठक ही केवळ समाजाच्या हितावर चर्चा करण्याच्या हेतूने आयोजित केली होती. ब्राह्मण समाजाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले आहे. भिक्षा मागून शिक्षण देणारा हा वर्ग आहे. तरीही समाजाला अपमानित करण्याचे प्रयत्न होतात, त्यावर बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली," असेही त्रिपाठी यांनी नमूद केले. आमदार रमेश मिश्रा यांनी स्पष्ट केले की, ब्राह्मण समाज नेहमीच भाजपच्या पाठीशी राहिला आहे. २०२७ मध्ये पुन्हा एकदा भाजपला पूर्ण ताकदीने निवडून आणण्याचे लक्ष्य या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे.
या बैठकीबाबत उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना माध्यमांनी विचारले असता, त्यांनी या चर्चा फेटाळून लावल्या. "अधिवेशनादरम्यान आमदार एकमेकांना भेटत असतात. याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज नाही. माध्यमे विनाकारण याला महत्त्व देत आहेत," असे सांगत त्यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
उत्तर प्रदेश विधानसभा अधिवेशनानंतर राज्यातील भाजपच्या ब्राह्मण आमदारांच्या एका खास मेळाव्याने राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला उधाण आले आहे. समाजवादी पार्टीचे नेते संग्राम यादव यांनी भाजपमधील घडामोडींसह योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर टीका केली आहे. "उत्तर प्रदेश राज्यातील जनता सरकारवर नाराज आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे लोकप्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेत नाहीत. त्यामुळेच भाजप आमदारांमध्ये अस्वस्थता असून बैठकांचे सत्र सुरू आहे. येणाऱ्या काळात अशा आणखी बैठका पाहायला मिळतील," असा दावा यादव यांनी केला आहे.
एनडीएचे घटक पक्ष असलेल्या सुहेलदेव भारतीय समाज पार्टी (SBSP)चे अध्यक्ष व मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी यांनी समाजवादी पक्षावरच टीकेचे आसूड ओढले. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीचे सरकार असताना ब्राह्मण समाजाला काय मिळाले? त्यांनी केवळ परशुरामजींचा पुतळा बसवला; पण नंतर ब्राह्मण समाजाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले," असा आरोपही त्यांनी केला आहे. राज्यातील इतर मागासवर्गीय समुदायाचे आमदार समाधानी असल्याने त्यांना अशा बैठकींची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.