UN lauds for India Pudhari
राष्ट्रीय

गुड न्यूज! भारताने वाचवले लाखो बालकांचे प्राण; संयुक्त राष्ट्राने केले तोंडभरून कौतूक

UN lauds for India: बालमृत्यू दर घटवण्यात देशाची प्रगती; 'आयुष्मान भारत'चीही स्तुती

Akshay Nirmale

पुढारी ऑनलाईन डेस्क: संयुक्त राष्ट्रसंघाने (UN) टाळता येण्याजोगे बालमृत्यू कमी करण्याच्या दिशेने भारताच्या प्रयत्नांचे आणि प्रगतीचे कौतुक केले आहे. "आदर्श आणि अनुकरणीय उदाहरण" (Exemplar) अशा शब्दात UN ने भारताचा गौरव केला आहे.

UN ने म्हटले आहे की, भारताने आपल्या आरोग्य यंत्रणेमध्ये धोरणात्मक गुंतवणूक बालमृत्यू रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे लाखो बालकांचे जीव वाचले आहेत.

संयुक्त राष्ट्राच्या या अहवालामुळे भारताच्या आरोग्य क्षेत्रातील ऐतिहासिक प्रगतीचे जागतिक स्तरावर कौतुक झाले आहे. पीटीआयने याबाबतचे वृत्त दिले आहे. (UN lauds India's progress in child mortality reduction)

संयुक्त राष्ट्रसंघाच्या इंटर-एजन्सी ग्रुप फॉर चाईल्ड मॉर्टॅलिटी एस्टिमेशन (UN IGME) ने मंगळवारी प्रकाशित केलेल्या अहवालात, बालमृत्यू दर कमी करण्यात उल्लेखनीय प्रगती करणाऱ्या पाच देशांची नोंद केली आहे.

यात भारत, नेपाळ, सेनेगल, घाना आणि बुरुंडी या देशांचा समावेश आहे. या देशांनी विविध धोरणांतून टाळता येणारे बालमृत्यू कमी करण्याच्या दिशेने वेगवान प्रगती साधली आहे.

राजकीय इच्छाशक्ती आणि ठोस गुंतवणुकीचा परिणाम

या अहवालात म्हटले आहे की, "राजकीय इच्छाशक्ती, वैज्ञानिक संशोधनावर आधारित धोरणे आणि आरोग्य क्षेत्रातील सातत्यपूर्ण गुंतवणूक यांच्या माध्यमातून, मर्यादित संसाधने असलेल्या देशांमध्येही लक्षणीय सुधारणांसह बालमृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटवता येऊ शकते.

या यशामुळे जग टाळता येण्याजोग्या बालमृत्यूच्या संपूर्ण उच्चाटनाच्या दिशेने पुढे जात आहे. भारताने आरोग्य यंत्रणेमध्ये केलेल्या धोरणात्मक गुंतवणुकीमुळे आधीच लाखो बालकांचे प्राण वाचवले आहेत आणि कोट्यवधी बालकांच्या निरोगी आयुष्याची वाट मोकळी केली आहे."

भारताची उल्लेखनीय प्रगती

सन 2000 सालापासून, भारताने पाच वर्षांखालील बालमृत्यूचे प्रमाण 70 टक्के आणि नवजात बालमृत्यूचे प्रमाण 61 टक्के कमी केले आहे. व्यापक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, वैद्यकीय सुविधा वाढवणे आणि प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी तयार करणे यांसारख्या विविध उपक्रमांमुळे हे यश मिळाले आहे.

आयुष्मान भारतचे कौतूक

आयुष्मान भारत हा जगातील सर्वात मोठा आरोग्य विमा कार्यक्रम आहे, जो प्रतिकुटुंब दरवर्षी सुमारे 5500 अमेरिकी डॉलर (अंदाजे ₹4.5 लाख) इतके कव्हरेज प्रदान करतो.

गर्भवती आणि नवजात बाळांसाठी योजना

भारताने आई व बाळांसाठी प्रतीक्षा गृहे, नवजात बालकांची काळजी घेणाऱ्या युनिट्स, जन्मजात व्यंग तपासणी कार्यक्रम यांसारख्या अनेक सुविधा विकसित केल्या आहेत. प्रत्येक गर्भवतीसाठी मोफत प्रसूती सुविधा (सीझेरियन सेक्शनसह), तसेच नवजात बालकांसाठी मोफत औषधोपचार, तपासण्या, वाहतूक आणि आहार सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.

नवजात बालकांच्या आरोग्यासाठी अँटीनेटल कॉर्टिकोस्टिरॉइड्स (प्रिमॅच्युअर डिलिव्हरीसाठी), सतत सकारात्मक एअरवे प्रेशर (CPAP) उपचार, दृष्टी व श्रवण तपासणीसाठी नियमित फॉलो-अप, यांसारख्या विविध उपाययोजनांमुळे नवजात बालकांचे जीवन वाचवले जात आहे.

आशा, अंगणवाडी सेविकांमुळे वेळेवर सेवा

भारतात प्रशिक्षित प्रसूती सेवक, आशा व अंगणवाडी सेविकांची नियुक्ती मोठ्या प्रमाणावर करण्यात आली. त्यातून गर्भवती, नवजात बालकांना वेळेवर आरोग्य सुविधा मिळतात.

या यशामागील प्रमुख कारणे:

  • सर्वांसाठी आरोग्य सेवा आणि समुदाय-आधारित उपचार प्रणाली

  • डेटा-आधारित धोरणे आणि दर्जेदार आरोग्य सेवा

  • लसीकरण मोहीम आणि बालसंगोपन कार्यक्रमांचा विस्तार

  • नाविन्यपूर्ण आरोग्य वित्तीय प्रणाली, जी दीर्घकालीन टिकाऊ उपाय देते

गोवरमुळे होणारे मृत्यूच्या प्रमाणात घट...

या अहवालानुसार सन 2000 मध्ये जगात 5 वर्षांखालील बालकांचा गोवरामुळे मृत्यू होण्याचे सर्वाधिक प्रमाण भारतात होते. 1,89,000 बालमृत्यू आणि केवळ 56 टक्के बालकांचे गोवर प्रतिबंधक लसीकरण झाले होते. 2023 पर्यंत भारताने गोवर लसीकरणाचे प्रमाण 93 टक्क्यांवर नेले आणि बालमृत्यू 97 टक्क्यांनी घटवून केवळ 5200 वर आणले.

UNICEF चा इशारा

दरम्यान, UNICEF च्या कार्यकारी संचालक कॅथरीन रसेल यांनी म्हटले आहे की, "लसीकरण, पोषण आणि स्वच्छ पाणी व मुलभूत आरोग्य सेवा यांसारख्या प्रभावी उपाययोजनांमुळे आज कोट्यवधी बालकांचे प्राण वाचले आहेत. परंतु, जर योग्य धोरणे आणि पुरेशी गुंतवणूक केली गेली नाही, तर हे यश गमावण्याचा धोका आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT