पुढारी ऑनलाईन डेस्क : भोपाळहून दिल्ली विमान प्रवासात मला एक तुटलेली सीट देण्यात आली. माझा असा समज होता की, टाटा समूहाने व्यवस्थापन हाती घेतल्यानंतर एअर इंडियाची सेवा सुधारली असेल; परंतु हा माझा गैरसमज होता, अशा शब्दांमध्ये केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एअर इंडियाच्या खराब सेवांवर सोशल मीडियावर पोस्ट करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर केलेल्या पोस्टमध्ये केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे की, "आज मला भोपाळहून दिल्लीला यावे लागले. मी एअर इंडियाच्या फ्लाइट क्रमांक AI436 वर तिकीट बुक केले होते, मला सीट क्रमांक 8C देण्यात आला होता. मी जाऊन सीटवर बसलो, सीट तुटलेली आणि खाली झुकलेली होती. यावर बसणे अस्वस्थ करणारे होते. याबाबत मी एअरलाइन कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली की, जर सीट खराब होती तर मला का देण्यात आली? यावर खराब सीट संदर्भात व्यवस्थापनाला आधीच कळवले होते तसेच या सीटच्या तिकीटाची विक्री केली जावू नये असे सांगितले होते, असे मला व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. माझा असा समज होता की टाटाने व्यवस्थापन हाती घेतल्यानंतर एअर इंडियाची सेवा सुधारली असेल, परंतु तो माझा गैरसमज होता."