पाटणा; वृत्तसंस्था : सरकारी योजनांचा लाभ घेऊनही आम्हाला मते न देणार्या नमकहरामांची मते आम्हाला नको आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते गिरीराज सिंह यांनी बिहारमधील अरवल जिल्ह्यात एका जाहीर सभेत केले. या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वादंग निर्माण केला आहे.
‘सरकारी योजनांचा लाभ घेऊनही जे लोक आम्हाला मतदान करत नाहीत, त्यांना नमकहराम म्हटले जाते आणि अशा लोकांची मते मला नको आहेत,’ असे सिंह म्हणाले. बेगुसरायचे भाजप खासदार असलेल्या गिरीराज सिंह यांनी एका मौलवींसोबतच्या संभाषणाचा दाखला दिला. ‘मी एका मौलवींना विचारले, तुमच्याकडे आयुष्मान भारत आरोग्य कार्ड आहे का?’ त्यांनी ‘हो’ म्हटले. मी विचारले, ‘ते हिंदू-मुस्लिम पाहून वाटले होते का?’ त्यांनी ‘नाही’ म्हटले. मग मी विचारले, ‘तुम्ही मला मतदान केले का?’ यावर त्यांनी खुदाची (देवाची) शपथ घेऊन नाही म्हटले, असे सिंह यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की, ‘मुस्लिम सर्व केंद्रीय योजनांचा फायदा घेतात, पण आम्हाला मतदान करत नाहीत. जो उपकार जाणत नाही, तो नमकहराम असतो.’
सिंह यांच्या वक्तव्यावर टीका करताना राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) प्रवक्ते मृत्युंजय तिवारी म्हणाले की, भाजप नेत्यांना हिंदू-मुस्लिम वगळता दुसरे काही बोलता येत नाही. ‘ते वाढती बेरोजगारी, महागाई किंवा शिक्षण आणि वैद्यकीय सुविधांबद्दल बोलू शकत नाहीत. विकासावर चर्चा करायची झाल्यास, ते हिंदू-मुस्लिम मुद्द्यांवर लक्ष वळवण्याचा प्रयत्न करतात,’ असे तिवारी म्हणाले.