नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भारताच्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) धोरणाअंतर्गत केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री आश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी ‘एआय कॉम्प्युट पोर्टल’ आणि ‘एआय कोष’ लाँच केला. या उपक्रमांद्वारे कृत्रिम बुद्धिमत्तेला चालना देणे आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्याचा उद्देश असल्याचे ते म्हणाले.
‘कॉम्प्युट पोर्टल’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना, संशोधकांना, स्टार्टपला, शैक्षणिक संस्थाना आणि सरकारी विभागांना १८ हजार हून अधिक जीपीयूस, क्लाऊड स्टोरेज आणि इतर एआय सेवा उपलब्ध होणार आहेत. यामुळे एआयमध्ये संशोधन व नवकल्पनांसाठी आवश्यक संसाधनांपर्यंत पोहोचणे सुलभ होईल. ‘एआय कोष’ हा एक सर्वसमावेशक डेटासेट प्लॅटफॉर्म आहे. जो संसाधने, साधने आणि तज्ज्ञ मार्गदर्शन प्रदान करतो. या प्लॅटफॉर्मवर असलेल्या डेटासेट्सचा उपयोग मॉडेल तयार करणारे आणि विकसीत भारतासाठीचे एआय मॉडेल तयार करण्यासाठी केला जाणार आहे.
आश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, कॉम्प्युट पोर्टलचा वापर भारताच्या स्वतःच्या फाउंडेशनल मॉडेलच्या विकासासाठी केला जाईल. या मॉडेलच्या तयारीसाठी ६७ अर्ज प्राप्त झाले असून, भारत त्याला इतर देशांच्या तुलनेत कमी खर्चात तयार करेल, असे ते म्हणाले. यासोबतच, तीन-चार वर्षांत भारताला जागतिक स्तरावर स्पर्धा करणारे जीपीयू निर्माण करता येतील, असे देखील ते म्हणाले.
आश्विनी वैष्णव यांनी भारताच्या चांद्रयान मोहिमेचा उल्लेख करत सांगितले की, भारताने इतर देशांच्या तुलनेत कमी खर्चात चांद्रयान मोहिम पार केली. याच धर्तीवर भविष्यात एआय फाउंडेशनल मॉडेल तयार केले जाईल.