पुढारी ऑनलाईन डेस्क : मणिपूर राज्यात पुन्हा एकदा हिंसाचाराचा भडका उडाला आहे. याची गंभीर दखल केंद्र सरकारने घेतली आहे. मणिपूरमधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि.१८) दिल्लीत उच्चस्तरीय बैठक पार पडली. यावेळी राज्यातील सुरक्षा व्यवस्था अधिक अभेद्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अमित शहा यांनी गृह मंत्रालय आणि सुरक्षा यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन मणिपूरमधील परिस्थितीचा आढावा घेतला. हिंसाचार थांबवण्यासाठी ठोस उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
आज झालेल्या बैठकीत मणिपूर राज्यात निर्माण झालेल्या आव्हानात्मक परिस्थिती लक्षात घेता, येथील सुरक्षा परिस्थितीचे मूल्यांकन करण्यात आले. तसेच केंद्र सरकार केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (सीएपीएफ) अतिरिक्त 50 कंपन्या एकूण 5,000 हून अधिक कर्मचारी मणिपूरमध्ये तैनात करणार असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी मणिपूरमध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (CAPF) 20 कंपन्या तैनात केल्या आहेत.