पुढारी ऑनलाईन डेस्क : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीला एक वर्षाचा कालावधी असताना आतापासून राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन हे द्विभाषिक धोरणावर राजकारण तापवत आहेत. अशातच राज्याचे माजी मुख्यमंत्री एडाप्पाडी पलानीस्वामी ( Edappadi K Palaniswami ) यांनी मंगळवारी (दि. २६ मार्च) केंद्रीय मंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. या भेटीनंतर अण्णाद्रमुक आणि भाजप २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा युती करतील, असे चर्चा राज्यातील राजकीय वर्तुळात रंगली आहे. ( Tamil Nadu Politics)
२०१९ लोकसभा निवडणुकीत अण्णाद्रमुक पक्षाने भाजपसह पट्टाली मक्कल कोची पक्षासोबत युती केली होती. या निवडणुकीत युतीला नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले होते. अण्णाद्रमुकला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले होते. यानंतर २०२३ या वर्षात अण्णाद्रमुकने भाजपबरोबर असणारी युती तोडली होती. तामिळनाडूतील भाजप नेते के. अण्णामलाई यांनी अण्णाद्रमुक आणि जयललिता यांच्यावरील विधानांमुळे ही युती तुटली होती. मात्र आता २०२६ मध्ये होणार्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांची पुन्हा जवळीक वाढली आहे. काही दिवसांपूर्वीच पलानीस्वीमी यांनी भाजपबरोबर पुन्हा युती करण्यासाठी सहा महिने वाट पाहा, असे उत्तर दिले होते.
भाजप आणि अण्णा द्रमुक या दोघांनीही तामिळनाडूतील सत्ताधारी द्रमुक सरकारच्या धोरणांवर जोरदार हल्लाबोल सुरु केला आहे. त्यामुळे आता हे दोन्ही पक्ष विधानसभा निवडणूक एकत्रीत लढवतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. पलानीस्वामी आणि अमित शहा यांच्यातील बैठकीच्या आदल्या दिवशी तामिळनाडूच्याचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी या बैठकीत द्विभाषिक धोरणाबद्दल बोलायला विसरू नका, असा टोला लगावला होता.