पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू आणि काश्मीरमधील बैसरन येथे झालेल्या दहशदवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा श्रीनगरमध्ये दाखल झाले. त्यांनतर त्यांनी तातडीने मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला , उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासह तेथील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीदरम्यान गृहमंत्र्यांनी दहशतवादी हल्ल्याच्या परिस्थितीचा आढावा घेत यंत्रणांना सर्तकतेचे आदेश दिले.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन येथे मंगळवारी (दि.२२) दुपारी अडीचच्या सुमारास दहशतवादी हल्ला झाला. तीन- चार दहशदवाद्यांनी लष्कराच्या गणवेशात येऊन हल्ला केला. या हल्ल्यात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेक पर्यटक जखमी झाले आहेत. या हल्ल्यात काही घोडेही जखमी झाले आहेत.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशदवादी हल्ल्यांबाबत गृहमंत्री अमित शहा यांनी शोक व्यक्त केला. मृतांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना असून या हल्ल्याबाबत मला दु: ख झाल्याचे त्यांनी सांगितले. या हल्ल्याच्या मुळाशी जाऊन या हल्ल्यात सहभागी असणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करत पंतप्रधान मोदी यांनी हल्ल्यातील मृतांबाबत सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त केला. या हल्ल्यातील जखमी लोक लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करतो. व हा दहशतवादी हल्ला घडवून आणणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी 'X' वरून ट्विटद्वारे स्पष्ट केले.