नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुच्चेरी या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांनंतर केंद्रातील मंत्रिमंडळात फेरबदल होईल, अशा चर्चा अनेक दिवसांपासून जोर धरत आहेत. अलीकडच्या काळात नीट, सीबीएससी अशा महत्त्वाच्या परीक्षांमध्ये पेपरफुटीसारखे प्रकरण झाले. यामध्ये देशभरात शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मोठी मागणी झाली. या पार्श्वभूमीवरही मंत्रिमंडळात खांदेपालट होणार का, याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी काही जागांसाठी राज्यसभा निवडणुक पार पडली. जून महिन्यातही देशात विविध राज्यात २४ जागांवर राज्यसभा निवडणूक होत आहे. यामध्ये १७ - १९ जागा सत्ताधारी एनडीएच्या वाट्याला येऊ शकतात. याद्वारे काही जुने तर काही नवे खासदार भाजप आणि मित्रपक्षांच्या कोट्यातून सभागृहात येतील. या सदस्यांपैकी देखील मंत्रिमंडळामध्ये काही चेहरे दिसू शकतात.
मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर सध्या सरकारमध्ये असलेले काही मंत्री आपले खाते टिकून राहावे, यासाठी प्रयत्न करत आहेत तर काही मंत्री अधिक चांगलं खाते मिळवण्यासाठी, बढती मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. केंद्र सरकारमध्ये मंत्री असलेले रवनीत सिंह बिट्टू आणि जॉर्ज कुरियन राज्यसभेचे सदस्य होते. त्यांचा कार्यकाळ संपत आहे मात्र त्यांना राज्यसभेत पुन्हा स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे मंत्रिमंडळात त्यांना स्थान नसेल हे स्पष्ट आहे. मंत्रिमंडळ विस्तारावर अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींना घ्यायचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यासंदर्भात निर्णय घेतील.
पंतप्रधान मोदींचे नेतृत्वात तिसऱ्यांदा निवडून आलेल्या केंद्र सरकारला नुकतीच दोन वर्ष पूर्ण झाली. दोन वर्षात विविध विभागांच्या मंत्र्यांनी काय कामगिरी केली, याचा अहवाल देखील पक्षश्रेष्ठींनी यापूर्वीच मिळवला आहे. त्यामुळे सरकारमधील मंत्र्यांचे प्रगती पुस्तक आधीच वरिष्ठांकडे उपलब्ध आहे. या अहवालावरूनही विद्यमान मंत्र्यांना कुठली जबाबदारी द्यायची, त्यांना मंत्रिमंडळात ठेवायचे की काढायचे, कोणाला बढती द्यायची की सभागृहात नव्या आलेल्या लोकांना मंत्रिमंडळात स्थान द्यायचे, यावर निर्णय होईल. आगामी विस्तारात प्रादेशिक, राजकीय आणि सामाजिक समीकरण तसेच आगामी निवडणुकांच्या दृष्टीने संतुलन साधण्याचा प्रयत्न असेल.
गेल्या काही दिवसात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी वरिष्ठ नेत्यांसह संघटनेतील लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. केंद्र सरकारला १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानेही ते विविध घटकांशी संवाद साधत आहेत. त्यामुळेही मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना बळ मिळत आहे. मात्र या चर्चांना लवकरच पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. जून महिन्यामध्ये १८ तारखेला राज्यसभा निवडणूक पार पडल्यानंतर जुलै महिन्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो.