ठाणे आणि पुणे मेट्रोचा विस्ताराला मंजुरी Pudhari
राष्ट्रीय

ठाणे आणि पुणे मेट्रो विस्ताराला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी

करण शिंदे

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा-

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर केंद्र सरकारने राज्याला मेट्रो विस्ताराचा गिफ्ट दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ५ मोठे निर्णय घेतले. यामध्ये तीन मेट्रो प्रकल्प तर २ विमानतळांना मंजुरी मिळाली आहे. मेट्रो प्रकल्पामध्ये महाराष्ट्रातील ठाणे रिंग मेट्रो आणि पुणे मेट्रोच्या नव्या लाईनला मंजुरी मंत्रीमंडळाने दिली.

८ लाख ७० हजार प्रवाशांना फायदा

केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली की, ठाणे शहरात वाहतूकीचा विचार करुन, मंत्रीमंडळाने ठाणे रिंग मेट्रोला मंजुरी दिली. यासाठी १२ हजार २०० कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. ठाण्याच्या चारी बाजूंना मेट्रो लाईनचा घेराव असेल. ठाणे रिंग मेट्रो जुन्या रेल्वे स्थानकाला नवीन रेल्वे स्थानकाबरोबर जोडण्याचे काम करेल. यासोबतच बुलेट ट्रेनच्या स्थानकांना जोडेल. ठाणे रिंग मेट्रो मुंबई मेट्रो आणि उपनगरांच्या मेट्रोशीही जोडली जाईल.हा प्रकल्प महाराष्ट्र आणि केंद्र सरकारची संयकुत योजना असेल. ठाणे रिंग मेट्रोची लांबी २९ किलोमीटर असेल. यामध्ये २२ मेट्रो स्थानके असतील. या प्रकल्पामुळे २०४५ पर्यंत ८ लाख ७० हजार प्रवाशी प्रवास करतील.

२ हजार ९५४ कोटी रुपयांचा प्रकल्प

अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, पुणे देशातील ५ मोठ्या महानगरांपैकी एक आहे. पुण्यातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मेट्रो लाईनचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला. यानुसार स्वारगेट ते कात्रज अशी नवीन मेट्रो लाईन करण्यास मंत्रीमंडळाने मंजुरी दिली. ५.४ किलोमीटरचा हा प्रकल्प असेल. यामध्ये तीन नवीन मेट्रो स्थानके असतील. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च २ हजार ९५४ कोटी रुपये असेल. हा प्रकल्प २०२९ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे वैष्णव यांनी सांगितले.

बंगळूर मेट्रो विस्ताराला मंजुरी

बंगळूर मेट्रोच्या फेज-३ प्रकल्पाला मंत्रिमंडळाला आज मंजुरी दिली. यामध्ये ४४. ६५ किलोमीटरच्या नवीन मेट्रो लाईनमध्ये ३१ स्थानके असतील. यासाठी १५ हजार ६११ कोटी रुपयांचा अंदाजित खर्च येणार आहे. हा प्रकल्प २०२९ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे बंगळूर मेट्रो २२०.२० किलोमीटर होईल. केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, भारत मेट्रो लाईनच्या निर्मितीत तिसऱ्या क्रमांकावर पोहचला असून, लवकरच अमेरिका मागे टाकून दुसऱ्या क्रमांकावर पोहचणार आहे. पहिल्या क्रमांकावर चीन आहे.

दोन विमानतळांना मंजुरी

केंद्रीय मंत्रिमंडळाने पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये प्रत्येकी एक विमानतळाला मंजुरी दिली. पश्चिम बंगालच्या बागडोगरामध्ये नवी विमानतळ होईल. बिहारच्या बिहीटामधील सुरक्षा दलाच्या विमानतळाचे विस्तारीकरण करुन सामान्य नागरीकांसाठी सुरु केले जाईल. यामुळे पटना विमानतळावरील भार कमी होईल. या दोन्ही प्रकल्पांसाठी २ हजार ९६२ कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT