पुढारी ऑनलाईन डेस्क : चार धाममधील महत्वाचे धाम असलेल्या केदारनाथ येथे जाण्यासाठी रोप वे बनवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय रोप वे विकास कार्यक्रमांच्या पर्वतमाला परियोजनेअंतर्गत उत्तराखंडमधील सोनप्रयाग ते केदारनाथ दरम्यानच्या १२.९ किमी लांबीच्या रोप वे प्रकल्पाला मंजुरी दिली, अशी माहिती आज बुधवारी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
"याचा मोठा फायदा होईल. यामुळे ८ ते ९ तासांचा प्रवास अवघ्या ३६ मिनिटांत होईल. त्यात ३६ लोक बसण्याची क्षमता असेल. १२.९ किमी लांबीचा हा प्रकल्प असून यासाठी ४,०८१ कोटी खर्च येईल. त्यासाठी मंजुरी दिली आहे," असे वैष्णव म्हणाले.
हा प्रकल्प डिझाइन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्सफर (DBFOT) तत्वावर विकसित केला जाणार आहे. हा रोप वे प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारीत विकसित करण्याचे नियोजन आहे. तो सर्वात अत्याधुनिक ट्राय-केबल डिटेचेबल गोंडोला (3S) तंत्रज्ञानावर आधारित असेल. याची क्षमता प्रति तास प्रति दिशा (PPHPD) १,८०० प्रवासी आणि दररोज १८ हजार प्रवासी वाहून नेण्याची असेल.
केदारनाथला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी हा रोप वे प्रकल्प एक वरदान ठरणार आहे. कारण यामुळे पर्यावरणपूरक, आरामदायी आणि जलद कनेक्टिव्हिटी मिळेल. तसेच एका दिशेने प्रवासाचा वेळ सुमारे ८ ते ९ तासांवरून सुमारे ३६ मिनिटांपर्यंत कमी होईल, असे सांगण्यात आले आहे.
या रोप वे प्रकल्पामुळे बांधकाम आणि कार्यवाहीदरम्यान तसेच हॉस्पिटॅलिटी, प्रवास, खाद्य आणि पेये (F&B) आणि पर्यटन यासारख्या संबंधित पर्यटन उद्योगांत वर्षभर मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील.