117 देशांतील आकडेवारी
महिलांची सुरक्षा रामभरोसे
घरगुती हिंसाचार गंभीर समस्या
न्यूयॉर्क : वृत्तसंस्था
जगभरात गेल्यावर्षी म्हणजे 2024 मध्ये दर दहा मिनिटांनी एका महिलेची तिच्या जवळच्या व्यक्तीकडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालाद्वारे जाहीर करण्यात आली आहे. वर्षभरात 117 देशांतील सुमारे 50 हजार महिला आणि मुलींना आपला जीव गमवावा लागला. सोबतच, महिला हिंसाचारविरोधी लढ्यात कोणतीही प्रगती झाली नसल्याबद्दलही संयुक्त राष्ट्रांनी निषेध नोंदवला आहे.
दरवर्षी हजारो महिला आणि मुलींचे बळी घेतले जात असून, या भयावह चित्रामध्ये कसलीही सुधारणा होण्याची चिन्हे नाहीत. घरगुती हिंसाचार ही गंभीर समस्या असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. जगातील सर्वच देशांमध्ये महिलांची हत्या केली जाते. तथापि, गेल्यावर्षी म्हणजे 2024 मध्ये आफ्रिकेत महिलांच्या हत्येची संख्या सर्वाधिक होती. तेथे सुमारे 22 हजार महिलांनी आपला जीव गमावला.
ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे महिला आणि मुलींना हिंसाचाराला सामोरे जावे लागते. हे अत्याचार थांबविण्यासाठी जगभरात कायद्यांची कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर गुन्हेगारांना वेळीच शासन करणे गरजेचे आहे. अनेकदा महिलांवरील अत्याचाराविरोधातील गुन्हे नोंदविण्यास विलंब केला जातो. त्यामुळे पुढील सगळी प्रक्रिया लांबत जाते. त्यातून महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढतात, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण या अहवालात नोंदविण्यात आले आहे.
या अहवालाबाबत संयुक्त राष्ट्रांच्या महिलांच्या धोरण विभागाच्या संचालक सारा हेंड्रिक्स यांनी म्हटले आहे की, स्त्री हत्या ही अचानक होणारी घटना नाही. हत्येपूर्वी महिला किंवा मुलींना अनेकदा धमक्या आणि छळाला सामोरे जावे लागते. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे महिला आणि मुलींवरील काही प्रकारच्या हिंसाचारांना प्रोत्साहन मिळाले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर विनासंमती सोशल मीडियावर फोटो शेअर करणे, डॉक्सिंग आणि डीपफेक व्हिडीओ यासारख्या नवीन प्रकारातून मानसिक छळ होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.