पुढारी ऑनलाईन डेस्कः उल्हासनगरमधील शासकीय निरीक्षण गृहातून ८ मुली पळून गेल्याची घटना घडली. या मुलींनी या निरीक्षणगृहातील लोखंडी गज वाकवून पळ काढला असून यातील सात मुलींना ताब्यात घेतलं आहे. तर एक मुलगी पळून जाण्यात यशस्वी झाली आहे. या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे, मुली पळून गेल्यानंतर इथल्या सुरक्षारक्षकाच्या ही बाब लक्षात आली. त्याने पोलीस ठाण्यात या संदर्भात माहिती दिली. या सात मुलींना कल्याण आणि विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाच्या परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, सध्या ताब्यात घेतलेल्या मुलींना शासकीय निरीक्षण गृहात पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे, रेल्वे ,बस स्थानक आणि इतरत्र सापडलेल्या मुलींना या शासकीय मुलींच्या निरीक्षण गृहात ठेवलं जातं, दरम्यान पळून गेलेल्या मुली उत्तर प्रदेश ,झारखंड, बिहार या भागातील आहेत. महिला मदतनिस आणि सुरक्षारक्षक असताना देखील या मुली लोखंडी गज वाकवून पळून गेल्याने इथल्या सुरक्षेसंदर्भात मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.