काँग्रेस नेते उदित राज. दुसर्‍या छायाचित्रात काँग्रेस खासदार शशी थरुर File Photo
राष्ट्रीय

Shashi Tharoor vs Congress | "इतके विश्वासघातकी कसे ? तुम्‍ही तर भाजपचे सुपर प्रवक्‍ता"

शशी थरुरांवर काँग्रेस नेते उदित राज भडकले, काँग्रेसशी प्रतारणा केल्‍याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

Shashi Tharoor vs Congress : पहलगाम दहशतवादी हल्‍ल्‍याला सडेतोड प्रत्‍युत्तर देत भारताने पाकिस्‍तानमध्‍ये घुसून ऑपरेशन सिंदूर राबवले. यानंतर आंतरराष्‍ट्रीय पातळीवर भारताची दहशतवादाविरोधातील भूमिका स्‍पष्‍ट करण्‍यासाठी सरकारने सात शिष्‍टमंडळे स्‍थापन केली. ही शिष्‍टमंडळे विविध देशांच्‍या दौर्‍यावर असून, भारताची भूमिका स्‍पष्‍ट करत आहेत. काँग्रेस खासदार शशी थरूर हे एका शिष्‍टमंडळाचे नेतृत्त्‍व करत असून, ते केंद्र सरकारची भूमिका स्‍पष्‍ट करत आहेत. मात्र आता शशी थरुर यांनी आंतरराष्‍ट्रीय पातळीवर मोदी सरकारचे केले स्‍तुती काँग्रेसच्‍या पचनी पडलेली दिसत नाही. काँग्रेस नेते उदित राज यांनी एक्‍स पोस्‍ट करत शशी थरूर यांच्‍यावर बोचरी टीका केली आहे.

मी तुम्हाला भाजपचे सुपर प्रवक्ता म्हणून घोषित करण्यास सांगेन

उदित राज यांनी केलेल्‍या पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, 'प्रिय शशी थरूर. मी पंतप्रधान मोदींना तुम्हाला भाजपचे सुपर प्रवक्ता म्हणून घोषित करण्यास सांगेन. याशिवाय, परदेशी दौर्‍यावरुन भारतात परतण्यापूर्वीच तुम्हाला परराष्ट्र मंत्री बनवले पाहिजे. शेवटी, पंतप्रधान मोदींच्या काळापूर्वी भारताने कधीही नियंत्रण रेषा किंवा आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली नाही, असे सांगून तुम्ही काँग्रेसच्या सुवर्ण इतिहासाकडे कसे दुर्लक्ष करू शकता. १९६५ मध्ये भारतीय सैन्याने अनेक बाजूंनी पाकिस्तानात प्रवेश केला. भारतीय सैन्याने लाहोर सेक्टरमध्ये प्रवेश केला तेव्हा पाकिस्तानला धक्का बसला. त्यानंतर १९७१ मध्ये पाकिस्तानचे दोन तुकडे झाले. इतकेच नाही तर यूपीए सरकारच्या काळात अनेक सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले; पण काँग्रेस नेतृत्त्‍वाखालील सरकारने त्याचा प्रचार केला नाही. तसेच राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न झाला नाही, असेही उदित राज यांनी आपल्‍या पोस्‍टमध्‍ये नमूद केले आहे.

पक्षाने तुम्‍हाला इतके काही दिले...

'ज्या पक्षाने तुम्हाला इतके काही दिले आहे त्या पक्षाला तुम्ही इतके फसवे कसे असू शकता?', असा सवाल करत शशी थरूर यांचा व्हिडिओही त्‍यांनी शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये शशी थरूर पनामातील पाकिस्तानच्या कारवायांबद्दल केलेल्‍या कारवााईला, भारताने कसे चोख प्रत्युत्तर दिले याबाबत सांगतात.

शशी थरूर नेमकं काय म्‍हणाले होते?

शशी थरूर म्‍हणाले होते की, 'गेल्या काही वर्षांत असा बदल झाला आहे की आता दहशतवाद्यांनाही माहित आहे की जर त्यांनी काही केले तर त्यांना किंमत मोजावी लागेल. २०१५ मध्ये उरी दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पहिल्यांदाच सर्जिकल स्ट्राईक केले. नियंत्रण रेषा ओलांडली. अशा प्रकारचा हल्ला यापूर्वी कधीही झाला नव्हता. कारगिल दरम्यानही आम्ही नियंत्रण रेषा ओलांडली नव्हती. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर आम्ही तेच केले. यावेळी आम्ही केवळ नियंत्रण रेषा ओलांडली नाही तर आंतरराष्ट्रीय सीमा देखील ओलांडली. आम्ही पाकिस्तानातील पंजाबमधील अनेक दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. आम्ही दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रांवर आणि मुख्यालयांवरही हल्ला केला, असेही शशी थरुर यांनी सांगितले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT