मुंबई : डिलिमिटेशन अर्थात मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. देशाच्या हितासाठी डिलिमिटेशन विधेयकाला आपला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट करताना, पक्षाच्या हितापेक्षा देशाचे हित महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. हे विधेयक उद्या मंजूर झाले, तर त्याचे गंभीर परिणाम संपूर्ण देशाला भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.
डिलिमिटेशन प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा आरोप करत ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सत्ताधाऱ्यांच्या सोयीनुसार मतदारसंघांची रचना केली जात असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, मतचोरीचे आरोप झालेले असताना संबंधित व्यक्तींना डिलिमिटेशन प्रक्रियेशी संबंधित समितीत स्थान दिले जात असल्याचा आरोपही त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
डिलिमिटेशनच्या नावाखाली उघडपणे मतचोरी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. या प्रक्रियेसाठी स्थापन करण्यात येणाऱ्या समितीच्या सदस्यांच्या नियुक्तीवरही त्यांनी आक्षेप घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या माध्यमातून समितीतील सदस्यांची नियुक्ती केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
मतचोरीचे आरोप झालेले असताना अशा व्यक्तींना डिलिमिटेशनसंदर्भातील समितीत स्थान देणे चुकीचे आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचाही या प्रक्रियेत समावेश असल्याचे समजते. त्यामुळे या समितीच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे ठाकरे म्हणाले. ही समिती म्हणजे केवळ फार्स असल्याची टीकाही त्यांनी केली.
संसदेत हे विधेयक घटनात्मक प्रक्रियेने नव्हे, तर घटनात्मक तरतुदींना धक्का देणाऱ्या पद्धतीने आणले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. लोकसभेतील जागा वाढवण्याचा प्रस्ताव असताना राज्यसभेतील जागाही वाढवणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. केवळ लोकसभेतील सदस्यसंख्या वाढवून नेमके काय साध्य होणार, असा प्रश्नही त्यांनी विचारला.
डिलिमिटेशनमुळे देशातील उत्तर आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये प्रतिनिधित्वावरून संघर्ष निर्माण होण्याची शक्यता असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. लोकसभेतील जागा वाढवताना सर्व राज्यांना समान न्याय मिळणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या निर्णयाचे दूरगामी परिणाम देशाच्या संघराज्य व्यवस्थेवर होऊ शकतात, अशी भूमिका त्यांनी मांडली.
सत्ताधाऱ्यांच्या राजकीय सोयीनुसार मतदारसंघांची पुनर्रचना केली जात असल्याचा आरोप करताना ठाकरे म्हणाले की, भाजपची संपूर्ण स्क्रिप्ट आधीच तयार आहे. त्यानुसार मतदारसंघ तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एक पंतप्रधान देशाला पुरत नसेल, तर दोन-तीन पंतप्रधान करणार आहात का, असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला.
आज सत्तेच्या माध्यमातून 'खोके' पाहणाऱ्यांच्या वाट्याला उद्या कचऱ्याचा डबा येईल, अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. तसेच, संसदेत आधीपासून असलेल्या खासदारांना सांभाळता येत नसेल, तर खासदारांची संख्या वाढवून काय साध्य होणार, असा सवालही त्यांनी केला.
महिला आरक्षण विधेयक आणि डिलिमिटेशन या दोन स्वतंत्र विषयांची सांगड घालू नये, अशी स्पष्ट भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली. महिला आरक्षणाला शिवसेना ठाकरे गटाचा सुरुवातीपासून पाठिंबा आहे. मात्र, महिला आरक्षणाच्या नावाखाली डिलिमिटेशन विधेयक पुढे आणू नये. महिला आरक्षण लागू करण्यासाठी मतदारसंघ पुनर्रचनेची अट जोडण्याची आवश्यकता काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सर्व खासदारांना आवाहन करताना ते म्हणाले की, पक्षाचे हित, वैयक्तिक स्वार्थ आणि राजकीय गणिते यापेक्षा देशाचे हित मोठे आहे. त्यामुळे सर्व खासदारांनी पक्षीय भूमिकेपेक्षा देशहिताला प्राधान्य द्यावे आणि या विधेयकाचे दूरगामी परिणाम लक्षात घेऊन निर्णय घ्यावा.
मागील अधिवेशनात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर संसदेचे कामकाज स्थगित करण्यात आले, असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला. विरोधकांचे प्रश्न आणि आक्षेप ऐकून घेण्याऐवजी संसद स्थगित करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संसदेत उपस्थितही राहिले नाहीत, अशी टीका त्यांनी केली.
संसद ही देशातील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची जागा आहे. मात्र, विरोधकांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी अधिवेशन स्थगित केले जात असेल, तर लोकशाही प्रक्रियेचे काय होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
डिलिमिटेशन विधेयकाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनाही आवाहन केले. शरद पवार यांनी महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा विचार करून देशहिताची भूमिका घ्यावी, असे ते म्हणाले. तसेच, स्टॅलिन यांनीही तामिळनाडूच्या हिताचा विचार करून या विधेयकाबाबत भूमिका निश्चित करावी, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, डिलिमिटेशन विधेयकाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या नऊ खासदारांना संसदेत उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. पक्षातून फुटून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेल्या सहा खासदारांनाही व्हिप लागू असल्याची भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे.
पक्षाचे मुख्य प्रतोद अनिल देसाई यांनी खासदारांना तीन ओळींचा व्हिप जारी केला आहे. २९ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील पक्षाच्या संसदीय कार्यालयात होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या बैठकीत डिलिमिटेशन विधेयक आणि संविधानाच्या १३२ व्या दुरुस्ती विधेयकाबाबत पक्षाची भूमिका आणि संसदेतील रणनीती निश्चित केली जाणार आहे. अनुपस्थित राहणाऱ्या खासदारांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही व्हिपमध्ये देण्यात आला आहे.
एकूणच, डिलिमिटेशन विधेयकावरून केंद्र सरकार आणि विरोधकांमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. संसदेच्या ३० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या विशेष अधिवेशनात या विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.