नवी दिल्ली- महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडी एकसंधपणे लढणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची बैठक झाली नाही, संसदेचे अधिवेशन सुरु असल्याने सर्व नेत्यांच्या भेटीगाठीसाठी दिल्लीत आल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आरक्षणाच्या मुद्यावर बांगलादेशसारखी परिस्थिती उद्भवू नये, म्हणून संसदेत निर्णय याविषयी निर्णय झाला पाहिजे, असेही ते म्हणाले. दिल्ली दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Uddhav Thackeray)
दरम्यान, सकाळपासून काँग्रस नेते विश्वजीत कदम, सांगलीचे खासदार विशाल पाटील, खासदार रजनी पाटील, काँग्रसचे ज्येष्ठ नेते खासदार दिग्विजय सिंह, समाजवादी पक्षाचे खासदार आदित्य यादव, तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार डेरेक ओबरायन, आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांच्यासह इतर नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
उद्धव ठाकरे यांनी या वेळी बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर होत असलेल्या हल्ल्यावर देखील भाष्य केले. इस्राइल, श्रीलंका आणि आता बांगलादेशमध्ये काय होते आहे? याकडे केंद्र सरकारने लक्ष देण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. जनतेचे न्यायालय सर्वात मोठे असते, जनतेच्या न्यायाचा निर्णय बांगलादेशमध्ये झाला आहे. लोकांची भावना समजून घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले. बांगलादेशमध्ये हिंदूंवर हल्ले होत असतील तर त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पावले उचलावेत, असे आवाहन त्यांनी केले. बांगलादेश येथील हिंदूंच्या रक्षणाची जबाबदारी ही मोदी सरकारची असल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे. भारतानेच बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून दिले होते. त्यामुळे पंतप्रधान मोदींना मणिपूरला जाता आले नसले तरी त्यांनी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी बांगलादेशला जावे किंवा तेथे होणारे हिंदूंवरील हल्ला रोखण्यासाठी प्रयत्न करावे, असा आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
रशिया आणि युक्रेनचे युद्ध पंतप्रधान मोदी यांनी थांबवले असे भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणत होते. आता त्यांनी बांगलादेशमध्ये सुद्धा युद्ध थांबवावे, अशा प्रकारची खोचक टीका त्यांनी केली. जनतेचे न्यायालय सर्वात मोठे असते. त्यामुळे कोणीही स्वतःला देवापेक्षा मोठे मानू नये, असा टोला देखील त्यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.
धारावीच्या मुद्यावरुन पुन्हा उध्दव ठाकरे यांनी गौतम अदानी यांच्यावर निशाणा साधला. जो मुंबईचा शत्रू तो माझा शत्रू म्हणत मुंबईची विल्हेवाट कोणाला लावू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. धारावीचा विकास झाला पाहिजे. त्याच्या विकासाच्या आड आम्ही नाहीत. धारावीकरांना त्याच ठिकाणी घरे मिळाले पाहिजे, ही शिवसेना उबाठाची भूमिका आहे. शरद पवार आणि अदानी यांची मैत्री आहे. परंतु अदानी माझेही शूत्र नाहीत. अदानी यांच्याकडून टेंडरच्या बाहेरच्या काही गोष्टी आम्ही होऊ देणार नाही. धारावीच्या लोकांवर अपात्रेताचा शिक्का टाकून त्यांना दुसरीकडे फेकत असाल तर चालणार आहे. आमचे सरकार आल्यावर टेंडर बाहेरील सर्व गोष्टी आम्ही रद्द करु. जो मुंबईचा शत्रू तो माझा शत्रू, मुंबईची विल्हेवाट कोणाला लावू देणार नाही. पवार साहेब मुंबईची वाट लावू देणार नाही, असा विश्वास असल्याचे ते म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत मविआचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार? याबाबत विचारले असते, ठाकरे यांनी मिश्किल टिप्पणी केली. मुख्यमंत्री म्हणून मी चांगले काम केले असे माझे सहकारी म्हणत असतील. तर याबाबत त्यांनाच विचारणा करा की, मी त्यांना पुन्हा मुख्यमंत्री म्हणून हवा आहे का? मी मुख्यमंत्री झालो तेव्हा स्वप्नातही विचार केला नव्हता. पण जबाबदारी मिळाल्यावर निभवण्याचा प्रयत्न केला असल्याचे ते म्हणाले.
सांगली लोकसभेत पराभव झाला त्याचे शल्य मनात आहे. मात्र विशाल पाटील मविआसोबत आल्याने, आता विधानसभेत आम्ही एकत्र आहोत, असे ठाकरे यांनी सांगितले. परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये पक्ष सोडून गेलेल्या गद्दार आमदारांना क्षमा नसल्याचे ते म्हणाले.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणीला विलंब करू नये. अशी विनंती शिवसेना ठाकरे गटाच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात केल्यानंतर सरन्यायाधीशांनी त्यांना फटकारले होते. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सरन्यायाधीशांनी देखील याचिकाकर्त्यांच्या जागी बसून बघावे. त्यांच्याबद्दल संपूर्ण आदर आहे. मात्र, रोग्याला योग्य वेळी औषध न दिल्यास त्याचा फायदा होत नाही हे त्यांना समजायला हवे, असे उदाहरण यावेळी त्यांनी दिले.