Accident file photo
राष्ट्रीय

Accident: हातात सिगारेट, १४० चा वेग अन् पुढच्या ६० सेकंदात ४ मित्र ठार..; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

Viral Accident Video: दोन कारची धडक होऊन झालेल्या या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला, तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

मोहन कारंडे

उदयपूर: हातात सिगारेट, कारमधील म्युझिक सिस्टमचा मोठा आवाज आणि वेग वाढवण्याचे वेड... एका मित्राने गाडीचा वेग इतका वाढवला की अहमदाबाद बायपासवर कार ताशी १४० किमी वेगाने धावू लागली. त्यानंतर कार उलटली, काचा फुटण्याचा आवाज झाला आणि सगळीकडे अंधार पसरला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

१७ जानेवारी रोजी पहाटे उदयपूरमधील सविना पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन कारची धडक होऊन झालेल्या या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला, तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताचा थरार

हा अपघात पहाटे ३ च्या सुमारास झाला. सहा मित्र एका कारमधून प्रवास करत होते. अपघातानंतर कारमधील तरुण सुमारे १० मिनिटे मदतीसाठी ओरडत होते. लोक घटनास्थळी पोहोचेपर्यंत चौघांचा मृत्यू झाला होता, तर दोन मित्र कारमध्ये गंभीर जखमी अवस्थेत वेदनेने विव्हळत होते.

व्हिडिओ आला समोर

अपघातापूर्वीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये चालक शेर मोहम्मद सुरुवातीला १०० ते १२० किमी वेगाने गाडी चालवताना आणि नंतर वेग १४० किमीपर्यंत वाढवताना दिसत आहे. व्हिडिओ सुरू झाल्यापासून अवघ्या १ मिनिट १० सेकंदात कारला अपघात झाल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, मागच्या सीटवर बसलेला एक तरुण मित्राला ताशी १४० किमी वेगाने गाडी न चालवण्याची वारंवार विनंती करताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. मात्र, त्याने त्याकडे दुर्लक्ष केले.

वाढदिवसाच्या जल्लोषावर विरजण

एका मित्राच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे रूपांतर या अपघातामुळे शोकात झाले. अपघातानंतर कारमधील तरुण मदतीसाठी ओरडताना ऐकू येत होते. शनिवारी पहाटे झालेल्या या अपघातात दोन्ही गाड्यांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. हे सर्व मित्र सविना भागातील नेला तलाव जवळ 'मेहफिल-ए-मिलाद' कार्यक्रमाला गेले होते. तिथून चहा पिण्यासाठी थोड्या अंतरावर जात असतानाच हा भीषण अपघात घडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT