नवी दिल्ली : राज्यातील मतदार याद्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी सुधारणा व्हावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाने केली. जर मतदार याद्यांत सुधारणा झाली नाही तर शिवसेना ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे पक्षाने सांगितले. शिवसेना ठाकरे गटाचे शिष्टमंडळ मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाशी भेटून मतदार याद्यांसंदर्भात चर्चा करणार आहे.
मतदार याद्यांतील चुका दुरूस्त करू शकत नाही, असे राज्य निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. त्यामुळे आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आलो आहोत, असे खासदार अरविंद सावंत यांनी सोमवारी सांगितले. केंद्रीय निवडणूक आयोगाला आज फोन केले प्रतिसाद मिळाला नाही म्हणून आम्ही आलो. आज निवडणूक आयुक्त एकटेच होते म्हणून त्यांनी उद्याची वेळ दिली. आज केंद्रीय निवडणूक आयोगाने सकारात्मक प्रतिसाद दिला, असे अरविंद सावंत म्हणाले. महाविकास आघाडीच्या वतीने तयार केलेले निवेदन निवडणूक आयोगाला देऊ, असे खासदार सावंत म्हणाले. निवडणूक आयोगाच्या बाहेर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.