Maharashtra Political Controversy | दोन खासगी विमानांतून ‘उबाठा’चे खासदार दिल्लीत आणले! 
राष्ट्रीय

Maharashtra Political Controversy | दोन खासगी विमानांतून ‘उबाठा’चे खासदार दिल्लीत आणले!

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : मंगळवारच्या रात्रीपासूनच ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना सुरुवात झाली होती. शिवसेना ठाकरे गटाच्या फुटणाऱ्या ६ खासदारांना दिल्लीत आणण्याची व्यवस्था केली गेली. त्यासाठी २ खासगी विमाने वापरली गेली. मध्यरात्री एकनाथ शिंदेदेखील दिल्लीत दाखल झाले. त्यांनी त्यांच्या कायदेशीर चमूशी सविस्तर चर्चा केली.

दुसरीकडे, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. या भेटीमध्ये पूर्वी ई-मेल करून दिलेले पत्र अधिकृतपणे लोकसभा अध्यक्षांना सादर केले आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे म्हणणे अधिकृतपणे संसदीय पक्षाचे नेते म्हणून अरविंद सावंत यांच्याकडून समजून घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय घेऊ नये, अशी विनंती करण्यात आली.

मी कोणाच्या संपर्कात नाही, मी ठाकरेंसोबत : राजाभाऊ वाजे

शिवसेना ठाकरे गट फुटण्याच्या संपूर्ण पार्श्वभूमीवर बोलताना ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजे म्हणाले की, मी कोणाच्याही संपर्कात नाही आणि कोणी माझ्याही संपर्कात नाही. मी उद्धव ठाकरेंसोबत आहे.

‘ऑपरेशन टायगर’ थांबवण्यासाठी खासदारांचे प्रयत्न

‘ऑपरेशन टायगर’ थांबवण्यात यावे, यासाठी ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांच्या वतीने अजूनही प्रयत्न सुरू असल्याचे समजते. आवश्यक तिथे उद्धव ठाकरेदेखील प्रयत्न करत असल्याचे समजते. शिंदेंचा डाव कायदेशीरदृष्ट्या फसू शकतो, असे ठाकरे गटाला वाटते. त्यामुळे ठाकरे गटाने ऑपरेशन थांबवण्यासाठी आणखी जास्त प्रयत्न सुरू केले आहेत.

शिंदे पिता-पुत्र दिल्लीत; मात्र नॉट रिचेबल

‘ऑपरेशन टायगर’ राबवत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना शिंदे गटाचे लोकसभेतील गटनेते डॉ. श्रीकांत शिंदे हे दोन्ही पिता-पुत्र दिल्लीतच असल्याचे समजते. मात्र, एरव्‍ही श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी सहज सापडणारे आणि माध्यमांना भेटणारे एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे माध्यमांच्या नजरेतही सापडले नाही, अनेक वाहिन्यांचे कॅमेरे सगळीकडे असताना शिंदे पिता-पुत्र कुठेच दिसले नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT