पुढारी ऑनलाईन डेस्क : एकाच सेवेसाठी आयफोन आणि अँड्रॉइड स्मार्टफोनवर ग्राहकांना वेगवेगळे दर आकारणी प्रकरणी केंद्र सरकारने कॅब अॅग्रीगेटर्स ओला आणि उबर यांना नोटीस बजावली आहे. ग्राहकांना एकाच राईड्ससाठी वेगवेगळे भाडे आकारले जात असल्याचा दावा करणाऱ्या वृत्तानंतर आता कंपन्यांना खुलासा करावा, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. याबाबतची माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी X वर पोस्टच्या माध्यमातून शेअर केली आहे.
उबर आणि ओला कंपनी ग्राहकांना आयफोन किंवा अँड्रॉइड डिव्हाइस वापरत असलेल्या स्मार्टफोनवर वेगवेगळे भाडे आकारत असल्याचे दिसून आल्याचा वृत्ताची ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने दखल घेतली आहे. दोन्ही कंपन्यांना बजावलेल्या नोटीसत म्हटलं आहे की, सीसीपीएने कंपन्यांना त्यांच्या किंमत पद्धती स्पष्ट करावी. तसेच संभाव्य भेदभावाबाबतही खूलासा करावा. भाडे आकरणीतीलपारदर्शकता आणि निष्पक्षता सुनिश्चित करण्यासाठी तपशीलवार माहिती सादर करावी.
काही दिवसांपूर्वी दिल्लीमधील एका उद्योजकाने वेगवेगळ्या मोबाईल फोनमधील डिव्हाइसेसची भाड्यांची तुलना करणारी पोस्ट X वर शेअर केली होती. त्यांनी उबर अॅपवर एका विशिष्ट ठिकाणासाठी वेगवेगळे भाडे दाखवणारे दोन फोनचा फोटो शेअर केल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले. या प्रकरणी उबरने असा कोणताही प्रकार असल्याचा दावा केला होता.