गडचिरोली : एटापल्ली तालुक्यात गट्टा-जांभिया पोलिस ठाण्यांतर्गत मोडस्के जंगलात बुधवारी दुपारी झालेल्या चकमकीत पोलिसांनी दोन महिला नक्षल्यांना कंठस्नान घातले.
घटनास्थळी पोलिसांनी स्वयंचलित एके 47 रायफल, एक अत्याधुनिक पिस्तूल, दारूगोळा व अन्य साहित्य ताब्यात घेतले. मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. मोडस्के जंगलात गट्टा दलमचे काही नक्षली दबा धरून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या नेतृत्वात पोलिसांच्या सी-60 दलाची पाच पथके त्या परिसरात नक्षलविरोधी अभियानावर रवाना करण्यात आली. पोलिसांनी नक्षल्यांची घेराबंदी केली. त्यानंतर नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन महिला नक्षली ठार झाल्या.
गेल्या 21 दिवसांत गडचिरोली पोलिसांनी दोन चकमकींमध्ये 6 नक्षल्यांना कंठस्नान घातले आहे. 27 ऑगस्टला भामरागड तालुक्यातील कोपर्शी जंगलात पोलिसांनी 4 नक्षल्यांना ठार केले. त्यानंतर बुधवारी मोडस्के जंगलात दोन नक्षली महिलांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले.