Sugar Industry | आयात साखर विक्रीसाठी दोन महिन्यांची मुदत; केंद्र सरकारकडून आयात नियमांत सुधारणा 
राष्ट्रीय

Sugar Industry | आयात साखर विक्रीसाठी दोन महिन्यांची मुदत; केंद्र सरकारकडून आयात नियमांत सुधारणा

साखर उद्योगाला दिलासा

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : केंद्र सरकारने शुल्कमुक्त कच्च्या साखरेच्या आयात आणि विक्रीसाठीच्‍या अटींमध्ये सुधारणा केली. नव्‍या नियमानुसार आयात केलेल्या कच्‍च्‍या साखरेवर प्रक्रिया करून ती देशांतर्गत बाजारात विकण्यासाठी असलेली ३१ ऑक्टोबरची अंतिम मुदत रद्द करण्यात आली असून आता कच्ची साखर दोन महिन्यांच्या आत पांढऱ्या किंवा शुद्ध साखरेमध्ये रूपांतरित करून देशांतर्गत बाजारात विकता येईल. या निर्णयामुळे साखर उद्योगाला दिलासा मिळाला आहे. आयातीसाठीची ३१ ऑक्टोबरची अंतिम तारीख मात्र कायम ठेवण्यात आली आहे.

सरकारने जारी केलेल्या एका अधिकृत अधिसूचनेत, विदेशी व्यापार महासंचालनालयाने २० ऑगस्टच्या पूर्वीच्या आदेशात बदल केला. जुन्या आदेशानुसार, ‘टॅरिफ रेट कोटा’अंतर्गत आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून ती ३१ ऑक्टोबरपर्यंत देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करणे आवश्यक होते.

ब्राझीलमधून येणार कच्ची साखर

साखर उद्योगाने ३१ ऑक्टोबरच्या पूर्वीच्या मुदतीबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. साखरेच्या आयातीसाठीचा एक प्रमुख स्रोत असलेल्या ब्राझीलमधून माल भारतात पोहोचण्यासाठी साधारणपणे ४०-४५ दिवस लागतात. बंदरावरील हाताळणी, रिफायनरीपर्यंतची वाहतूक आणि इतर आयात प्रक्रिया यामध्ये आणखी वेळ जातो, ज्यामुळे कच्च्या साखरेवर प्रक्रिया सुरू होण्यास विलंब होतो. माल पोहोचल्यानंतर कच्च्या साखरेचे पांढऱ्या किंवा शुद्ध साखरेत रूपांतर करून ती देशांतर्गत बाजारात आणण्यासाठीही कारखान्यांना वेळ लागतो. ‘ॲडव्हान्स ऑथोरायझेशन स्कीम’अंतर्गत साखर रिफायनर्स आयात शुल्क न भरता कच्च्या साखरेची आयात करू शकतात. त्या बदल्यात त्यांना भारतात साखरेवर प्रक्रिया करून तयार उत्पादन निर्यात करणे आवश्यक असते.

साखरेचे दर क्विंटलला पाचशे रुपयांनी गडगडले

पुणे : ऑगस्ट महिन्यात दिलेल्या कोट्यानुसार साखर विक्रीस सहा दिवसांचा कालावधी शिल्लक राहिल्यामुळे आणि ग्राहकांकडून खरेदी कमी होत आहे. त्यामुळे निविदांमध्ये साखरेचे दर क्विंटलला ५०० रुपयांनी गडगडले असून एस ३० ग्रेडचा दर घटून ५४०० ते ५५०० रुपयांपर्यंत खाली आला. केंद्र सरकारकडून साखर दरवाढीला आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या विविध उपाययोजनांमध्ये सट्टेबाजांवर लक्ष केंद्रित झाले असून कारखान्यांकडील विक्रीनुसार उपलब्ध साखर साठ्याचे सुरू असलेल्या माहिती संकलनामुळे संभाव्य कारवाईच्या शक्यतेने दबाव निर्माण झाल्यामुळे दरात मोठ्या प्रमाणात घसरण सुरू झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT