पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. सुरक्षा दलांनी या भागात दहशतवादविरोधी कारवाई सुरु केली होती. या दरम्यान सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत चकमक झाली. श्रीनगरच्या खानयार भागातही अशाच प्रकारची चकमक सुरु आहे. या घटनेच्या काही तासांनंतर अनंतनागमध्ये चकमक सुरु झाली.
या भागात काही दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलांनी सर्च ऑपरेशन सुरु केले होते. या दरम्यान झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले. काश्मीर खोऱ्यात दहशतवादाशी संबंधित शुक्रवारपासूनची ही चौथी घटना आहे.
बडगाम जिल्ह्यात शुक्रवारी उत्तर प्रदेशातील दोन परप्रांतीय कामगारांवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले. त्यांच्यावर श्रीनगरमधील जेव्हीसी हॉस्पिटल बेमिनामध्ये उपचार सुरू आहेत.
जम्मू- काश्मीरमध्ये शनिवारी सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी चकमक सुरु झाली. अनंतनागमध्ये दोन दहशतवाद्यांना ठार केले. तर श्रीनगरमधील खानयार (Khaynar Encounter) येथे सुरक्षा दलांनी दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरले आहे. येथे अद्याप चकमक सुरु आहे. पोलीस आणि सीआरपीएफ यांची येथे संयुक्त कारवाई सुरु आहे.