army-terrorists flint; 2 martyred, 4 terrorists dead
दोन चकमकींत चार दहशतवाद्यांचा खात्मा. file Photo
राष्ट्रीय

काश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा; दोन लढवय्ये जवान शहीद

arun patil

जम्मू : जम्मू-काश्मिरात शनिवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्या दोन चकमकींत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून, दोन जवानही या चकमकींत शहीद झाले. दोनपैकी एक चकमक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पोलिस, सुरक्षा दले व लष्कराच्या तुकड्या या मोहिमेत सहभागी झाल्या असून, उरलेल्या दहशतवाद्यांचा लवकरच सफाया करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.

मोदरगाम आणि चिन्नीगाम या दोन गावांमध्ये या चकमकी झडल्या. कुलगाम परिसरात दहशतवादी लपून बसल्याची खबर मिळाल्यानंतर शनिवारी पहाटेच सुरक्षा दलांनी पोलिस व लष्करी जवानांच्या मदतीने शोधमोहीम हाती घेतली. त्यात चिन्नीगाम येथे सर्वात मोठी चकमक झडली. एका घरात दडून बसल्याचे कळाल्यानंतर सुरक्षा दलांनी त्या घराला वेढा टाकला; पण आतील दहशतवाद्यांनी जवानांवर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. त्यात चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या मृत दहशतवाद्यांमध्ये हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेचा विभागीय कमांडर फारूक नल्ली याचाही समावेश आहे.

दुसरी चकमक मोदरगाम येथे झडली. तेथेही लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर अंदाधुंद गोळीबार केला. त्यात भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले. यानंतर भारतीय सुरक्षा दले व लष्कराने आक्रमक भूमिका घेत या दहशतवाद्यांच्या भोवतीचा फास आवळत नेला आहे. तेथे अद्यापही चकमक सुरू असून, या भागात दोन ते तीन दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांच्या सूत्रांनी दिली आहे. पोलिस व स्थानिक खबर्‍यांच्या मदतीने या दहशतवाद्यांच्या जंगलात लपलेल्या साथीदारांना शोधण्याची समांतर मोहीम हाती घेण्यात आली आहे.

महिनाभरात 6 दहशतवादी ठार

जम्मू व काश्मीरमध्ये 1 जून ते 6 जुलै या कालावधीत सुरक्षा दलांनी आतापर्यंत 6 दहशतवाद्यांना यमसदनी धाडले आहे. त्यात डोडामध्ये सलग दोन दिवस चाललेली चकमक आणि उरीत सीमा ओलांडून येणार्‍या दहशतवाद्यांचे एन्काऊंटर यांचा समावेश आहे.

SCROLL FOR NEXT