प्रातिनिधिक छायाचित्र.  File Photo
राष्ट्रीय

भारतीय मच्छिमारांवर श्रीलंकेच्या नौदलाचा गोळीबार, ५ जखमी, दाेन गंभीर

श्रीलंकेच्या कार्यवाहक उच्चायुक्तांना भारताने बजावले समन्‍स

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : डेल्फ्ट बेटाजवळ श्रीलंकेच्या नौदलाने केलेल्या गोळीबारात पाच भारतीय मच्छीमार जखमी झाले असून, यातील दाेघांची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी भारताने श्रीलंकेकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. श्रीलंकेच्या कार्यवाहक राजदूताला परराष्ट्र मंत्रालयात बोलावण्यात आले. गाेळीबाराच्‍या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्‍या निवेदनात देण्‍यात आली आहे.

जखमी भारतीय मच्छिमारांवर जाफना रुग्णालयात उपचार सुरू

परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलल्‍या निवेदनात म्‍हटलं आहे की, 'आज सकाळी डेल्फ्ट बेटाजवळ १३ भारतीय मच्छिमारांना ताब्यात घेत असताना श्रीलंकेच्या नौदलाने गोळीबार केला. यामध्‍ये पाच भारतीय मच्छीमार जखमी झाले असून, यातील दाेघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर जाफना रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जाफना येथील भारतीय वाणिज्य दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जखमी मच्छिमारांची भेट घेतली.

श्रीलंकेच्या कार्यवाहक उच्चायुक्तांकडे भारताने व्‍यक्‍त केला तीव्र निषेध

नवी दिल्लीतील श्रीलंकेच्या कार्यवाहक उच्चायुक्तांना आज (दि.२८) सकाळी परराष्ट्र मंत्रालयात बोलावण्यात आले. भारताने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. कोलंबोमधील भारतीय उच्चायुक्तालयानेही श्रीलंका सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयासमोर हा विषय उपस्थित केला आहे. भारत सरकारने नेहमीच मच्छिमारांशी संबंधित समस्या मानवीय आणि मानवतावादी पद्धतीने सोडवण्याच्या गरजेवर भर दिला आहे. यामध्ये उपजीविकेशी संबंधित बाबींचाही विचार करण्यात आला आहे. कोणत्याही परिस्थितीत बळाचा वापर स्वीकारार्ह नाही. या संदर्भात दोन्ही सरकारांमधील विद्यमान सहमतीचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे, असेही परराष्‍ट्र मंत्रालयाने जारी केलेल्‍या निवेदनात नमूद करण्‍यात आले आहे.

कराईकल येथून १३ मच्छिमारांना अटक

श्रीलंकेच्या नौदलाने पुडुचेरीच्या केंद्रशासित प्रदेशातील कराइकल येथून १३ मच्छिमारांना समुद्र सीमा उल्‍लंघन प्रकरणी अटक केली आहे. पुद्दुचेरी सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सरकार मच्छिमार आणि त्यांच्या यांत्रिक बोटी सोडण्यासाठी केंद्र सरकारचा हस्तक्षेप मागेल. मच्छिमारांच्या सुटकेसाठी सरकार परराष्ट्रमंत्र्यांच्या संपर्कात असल्याचा दावा पुद्दुचेरीचे मत्स्यव्यवसाय मंत्री के. लक्ष्मीनारायणन यांनी केला आहे.

पलानीस्वामी यांनी द्रमुक सरकारवर टीका केली

श्रीलंकेचे नौदल राज्यातील भारतीय मच्छिमारांना अटक करते तेव्हा राज्य सरकार केंद्राला पत्र लिहिण्यापुरते मर्यादित असते, अशा शब्‍दांमध्‍ये ऑल इंडिया द्रविड मुन्नेत्र कझगम (एआयएडीएमके) चे प्रमुख आणि तामिळनाडूचे विरोधी पक्षनेते पलानीस्वामी यांनी द्रमुक सरकारवर टीका केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT