गाझियाबाद : बॉलीवूड अभिनेत्री दिशा पाटणीच्या बरेलीतील घराबाहेर मागील आठवड्यात गोळीबार करणारे गोल्डी ब्रार-रोहित गोदरा टोळीतील दोन गँगस्टरना पोलिसांनी बुधवारी चकमकीत कंठस्नान घातले. दिल्ली पोलिस स्पेशल सेल, उत्तर प्रदेश ‘एसटीएफ’ आणि हरियाणा ‘एसटीएफ’च्या संयुक्त कारवाईत त्रोनिका सिटी परिसरात झालेल्या चकमकीत दोघांचा अंत झाला.
त्रोनिका सिटी परिसरात झालेल्या कारवाईत दोन सक्रिय गुन्हेगारांना गोळी लागून गंभीर दुखापत झाली. तत्काळ त्यांना लोनी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रविंदर (रा. रोहतक, हरियाणा) आणि अरुण (रा. सोनिपत) अशी या गँगस्टरची नावे आहेत. प्राथमिक चौकशीत हे दोघे 11 सप्टेंबर रोजी दिशा पाटणीच्या बरेलीतील घराबाहेर झालेल्या गोळीबारात थेट सामील होते.