राष्ट्रीय

पुणे : कोरोना अत्यवस्थ व मयत रुग्णांच्या अंगावरील दागिने चोरणारे विकृत अटकेत

Pudhari News

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोरोना महामारी अनेकांना न भरून येणाऱ्या वेदना देत आहे. काही ठिकाणी तर कोरोनाने संपूर्ण परिवार गिळंकृत केला आहे. आयुष्यभर काबाड कष्ट करून जमा केलेली पुंजी नागरिक नातेवाईकांच्या उपचारावर खर्च करत आहेत. पैसा खर्च करून देखील कित्येक जणांवर जवळची माणसे गमावण्याची वेळ आली. अशातच काहींनी महामारीच्या संधीचे सोने करत कोणी रेमडेसिव्हीरचा काळाबाजार केला तर कोणी अन्य प्रकार….

बाणेर येथील महापालिकेने सुरू केलेल्या कोविड हॉस्पिटलमध्ये तर मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार समोर आला आहे. कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांना उपचारासाठी तेथे दाखल केल्यानंतर त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चतुःश्रुंगी पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. मोठ्या प्रमाणात रुग्णाच्या नातेवाईकांकडून तक्रारी येऊ लागल्यानंतर हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमुळे समोर आला. अत्यवस्थ व मयत झालेल्या रुग्णाच्या अंगावरील दागिने चोरीला जात होते.

शारदा अनिल अंबिलढगे (वय ३६, रा.रहाटणी, थेरगाव) आणि अनिल तुकाराम संगमे (वय ३५, रा. रहाटणीगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत डॉ. अजयश्री मस्कर (रा. बाणेर) यांनी फिर्याद दिली आहे. बाणेर येथील कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२० आणि फेब्रुवारी ते मे २०२१ दरम्यान हा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर येथे महापालिकने सुरू केलेले कोरोना हॉस्पिटल डॉ. किरण भिसे यांना चालविण्यास दिले आहे. या ठिकाणी डॉ. मस्कर हे कोविड हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय काम पाहतात. या हॉस्पिटलमध्ये एकाच वेळी ३३४ रूग्णांवर एकाच वेळी उपचार दिले जाऊ शकतात. हे हॉस्पिटल फक्त कोविड रुग्णासाठी असल्यामुळे रुग्णांची परिस्थिती पाहून त्यांना उपचार दिले जातात. एकादा का रुग्णांना दाखल करून घेतले की तेथे या ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांना प्रवेश दिला जात नाही.

रुग्णांच्या सेवेसाठी डॉक्टर, नर्स, आया असे कामगार आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांचे नातेवाईकांकडून मौल्यवान ऐवज, मोबाईल चोरीच्या तक्रारी येत होत्या. तसेच, काही मयत झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी देखील दागिने चोरी गेल्याचे सांगितले होते. त्यानुसार काही जणांनी हॉस्पिटलच्या प्रशासनाकडे अर्ज केले होते.

दरम्यान, तक्रारीच्या पार्श्वभूमीवर फिर्यादी डॉ मस्कर यांनी सर्व कर्मचाऱ्यांना बोलवून याबाबत विचारणा केली होती. तसेच, या प्रकाराबद्दल माहिती देण्यास सांगितले. मात्र कोणी काही सांगितले नाही. स्वच्छता व इतर कामे करणाऱ्या कामगारांचे सुपरवायझर श्रवण कुंभार व फिर्यादी यांनी हॉस्पिटलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी आरोपी शारदा अंबिलढगे ही रुग्णाच्याजवळ जाऊन पडदा लावून काम करताना दिसली.

तिच्याकडे विचारणा केली असता तिने चोरी केली नसल्याचे सांगितले. तिच्यावर संशय आल्यामुळे तिला डिसेंबर महिन्यात कामावरून काढून टाकले. पण, नंतर दोन महिने आया न मिळाल्यामुळे पुन्हा तिला कामावर घेतले. त्यानंतर पुन्हा रुग्णांच्या अंगावरील दागिने चोरीच्या तक्रारी येऊ लागल्या. त्यानंतर सीसीटीव्हीत पाहिल्यानंतर चोरीचा हा प्रकार समोर आला. याप्रकरणी चतुःश्रुंगी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करून दागिने चोरणारी महिला व तिच्याकडून ते विकत घेणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राजेश माळेगावेे करीत आहेत. 

सात रुग्णांचा ऐवज चोरला


हॉस्पिटलमध्ये उपाचर घेणाऱ्या सात रुग्णांचे दागिने व मोबाईल असा एक लाख ३४ हजार रूपयांचा ऐवज महिलेने चोरल्याचे तपासात समोर आले आहे. या सात ही घटनांमध्ये महिला रुग्णांच्या अंगावरील दागिने, मोबाईल चोरीला गेले होते. हा सर्व ऐवज शारदा अंबिलढगेने चोरल्याचे समोर आले आहे. तर तिचा साथीदार संगमे हा चोरी केलेल्या दागिण्याची विल्हेवाट लावण्याचे काम करत होता. 


तक्रार दाखल झाल्यानंतर तत्काळ तपास करून पोलिसांनी एक महिला व तिच्या साथीदाराला अटक केली आहे. कोविड हाॅस्पिटलमध्ये दाखल केलेल्या रुग्णाच्या अंगावरील दागिणे ते चोरी करत होते. चोरी केलेले दागिणे त्यांना परत मिळवून देण्यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत. 


– राजकुमार वाघचाैरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक चतुःश्रृंगी 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT