मॉडले व अभिनेत्री ट्विशा शर्माच्‍या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची स्वतःहून दखल घेतलेल्या (सुओ मोटो) याचिकेवर आज (दि. २५ मे) सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.  Pudhari
राष्ट्रीय

Twisha Sharma case| ट्विशा शर्माच्‍या 'माजी न्यायाधीश' सासूबाबत सुप्रीम कोर्ट काय म्हणाले?

Supreme Court on Twisha Sharma case| सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी केले प्रसारमाध्यमांनाही आवाहन

पुढारी वृत्तसेवा

Supreme Court on Twisha Sharma case

नवी दिल्ली : मॉडले व अभिनेत्री ट्विशा शर्माच्‍या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची स्वतःहून दखल घेतलेल्या (सुओ मोटो) याचिकेवर आज (दि. २५ मे) सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. "ट्विशा शर्माच्‍या मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष चौकशी सुनिश्चित केली पाहिजे," असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. यावर, "या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे (CBI) सोपवला जाईल," अशी माहिती मध्य प्रदेश सरकारने खंडपीठाला दिली.सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती विपुल एम. पांचोली यांच्या खंडपीठाने मीडिया आणि या प्रकरणातील दोन्ही बाजूंच्या लोकांना प्रसारमाध्यमांना कोणतेही वक्तव्य न करण्याचे आवाहन केले.

सरन्यायाधीशांनी प्रसारमाध्यमांनाही केले मोठे आवाहन

"आम्ही प्रसारमाध्यमांना विनंती करतो की त्यांनी मित्र किंवा नातेवाईक इत्यादींचे जबाब (बातम्यांमध्ये) दाखवू नयेत. मृत तरुणीची सासू या माजी जिल्हा न्यायाधीश आहेत आणि 'न्यायव्यवस्था या खटल्याला उशीर करत आहे' असे म्हटले जाणे अत्यंत दुर्दैवी आहे, अशी खंतही सरन्‍यायाधीश सूर्य कांत यांनी यावेळी व्‍यक्‍त केली.

एक असा वर्ग आहे जो....

सरन्यायाधीश म्हणाले की, "पीडित कुटुंब किंवा दुसऱ्या कुटुंबाच्या वक्तव्यांवर जाऊ नका. अन्यथा, एक वर्ग असा आरोप करत आहे की न्यायव्यवस्था निष्पक्ष सुनावणीची परवानगी देत ​​नाहीये. आम्हाला आमच्या राज्य तपास यंत्रणांवर किंवा सीबीआयवर कोणताही संशय नाही. परंतु, सध्या (बाहेर) एक वेगळाच नरेटिव्ह (प्रवाद) तयार केला जात आहे. जी दुर्दैवी घटना घडली आहे, तिचा तपास पूर्णपणे निष्पक्ष आणि कोणत्याही भेदभावाशिवाय व्हावा, हे आम्ही सुनिश्चित करू."

सासरच्या घरी आढळला होता मृतदेह,

ट्विशाचे समर्थ सिंग यांच्‍याबरोबर डिसेंबर महिन्‍यात विवाह झाला होता. ती १२ मे रोजी भोपाळच्या कटारा हिल्स येथील सासरच्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली होती. या घटनेनंतर तिच्या कुटुंबीयांनी हुंड्यासाठी छळ केल्याचे आरोप केले, ज्याच्या आधारे पती समर्थ सिंग आणि सासू गिरिबाला सिंग यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पती पोलीस कोठडीत

सुमारे १० दिवस फरार राहिल्यानंतर समर्थ सिंग शुक्रवारी जबलपूर न्यायालयात आत्मसमर्पण करण्यासाठी पोहोचला होता, तिथून पोलीस त्याला ताब्यात घेऊन भोपाळला आले. स्थानिक न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दुसरीकडे, सासू गिरिबाला सिंग यांना वारंवार नोटीस देऊनही त्या अद्याप चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर झालेल्या नाहीत.

SCROLL FOR NEXT