चेन्नई : तामिळनाडूमध्ये सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षासाठी सरकार स्थापन करणे कठीण होताना दिसत आहे. पक्षाचे प्रमुख आणि अभिनेते विजय यांनी गुरुवारी (दि. ७) सलग दुसऱ्या दिवशी राजभवन येथे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेतली. सुमारे एक तास चाललेल्या या भेटीनंतर ते तेथून रवाना झाले.
दरम्यान, विजय यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांकडे दोन महिन्यांची मुदत मागितली असल्याचे ‘इंडियन एक्स्प्रेस’ने त्यांच्या वृत्तात म्हटले आहे. या घडामोडीमुळे तामिळनाडूतील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
राज्यपालांनी त्यांना स्पष्ट केले आहे की, त्यांना राज्यात स्थिर सरकार हवे आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेचा दावा करण्यापूर्वी 118 आमदारांचे संख्याबळ असणे आवश्यक आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जोपर्यंत विजय राज्यपालांकडे 118 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र सादर करत नाहीत, तोपर्यंत ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकणार नाहीत.
तामिळनाडू विधानसभेच्या एकूण जागा 234 आहेत. बहुमतासाठी 118 आमदारांचा पाठिंबा असणे गरजेचे आहे. टीव्हीकेने 108 जागा जिंकल्या आहेत. विजय दोन जागांवर निवडून आले आहेत. एका जागेवरील राजीनामा दिल्यास त्यांच्याकडे 107 संख्याबळ राहते. काँग्रेसच्या पाच जागा धरल्यास आणखी सहा आमदारांचा पाठिंबा मिळवावा लागणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा एका प्रस्तावावर चर्चा होत आहे, ज्यामध्ये एआयएडीएमके सरकार स्थापन करेल आणि डीएमके बाहेरून पाठिंबा देईल. या फॉर्म्युल्यामध्ये लहान पक्षांचा पाठिंबा घेण्याबाबतही विचार सुरू आहे. मात्र, अद्याप कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही.
निवडणुकीत १०८ जागा जिंकणाऱ्या ‘टीव्हीके’ला काँग्रेसने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे जोसेफ विजय यांच्याकडे सध्या ११२ आमदारांचे संख्याबळ झाले आहे. मात्र, बहुमताचा आकडा गाठण्यासाठी त्यांना अद्याप मोठी कसरत करावी लागणार आहे.
या संपूर्ण सत्तेच्या समीकरणात एक तांत्रिक पेच निर्माण झाला आहे. टीव्हीके प्रमुख विजय यांनी दोन विधानसभा मतदारसंघांतून निवडणूक लढविली होती आणि दोन्ही ठिकाणी त्यांनी विजय मिळवला आहे. नियमानुसार, त्यांना लवकरच एका जागेचा राजीनामा द्यावा लागेल. विजय यांनी एका जागेचा राजीनामा दिल्यानंतर, सभागृहातील टीव्हीकेच्या संख्याबळात घट होईल आणि त्यानंतर सत्तास्थापनेसाठी त्यांना आणखी ७ आमदारांच्या समर्थनाची आवश्यकता भासणार आहे.
बहुमतासाठी आवश्यक असलेल्या जादूई आकड्यापर्यंत पोहोचण्यासाठी जोसेफ विजय यांना अपक्ष किंवा इतर लहान पक्षांची मनधरणी करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर, त्यांनी राज्यपालांकडे मागितलेला दोन महिन्यांचा अवधी अत्यंत कळीचा मानला जात आहे. तमिळनाडूच्या राजकारणातील हा सत्तासंघर्ष आता कोणत्या वळणावर पोहोचतो, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.