मॉडेल आणि अभिनेत्री द्विशा शर्मा मृत्यू प्रकरणी सासू निवृत्त न्यायाधीश गिरिबाला सिंह हिला सीबीआयने अटक केली आहे.  Pudhari
राष्ट्रीय

Tvisha Sharma Death Case | आधी जामीन रद्द, आता सीबीआयकडून अटक... ट्विशा शर्माच्‍या 'माजी न्यायाधीश' सासूच्‍या अडचणीत वाढ

Tvisha Sharma Death Case | कटारा हिल्‍स निवासस्‍थानी सलग अनेक तास चौकशीनंतर सीबीआयने केली कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Tvisha Sharma death case

इंदौर : मॉडेल आणि अभिनेत्री द्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. द्विशाच[ सासू निवृत्त न्यायाधीश गिरिबाला सिंह हिचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्‍च न्‍यायालयाने फेटाळल्‍यानंतर आज (दि. २८) सीबीआयने तपासाचा वेग वाढवला. कटारा हिल्स येथील निवासस्थानी अनेक तास चौकशी केली. यानंतर सीबीआयने तिला अटक केली आहे.

अनेक तास चौकशी, गोळा केले पुरावे

सीबीआयचे पथक आज सकाळी साडेदहाच्या सुमारास गिरिबाला सिंह यांच्या घरी पोहोचले. त्यानंतर तिथे त्यांची अनेक तास चौकशी करण्‍यात आली. सीबीआय अधिकाऱ्यांनी घराच्या एका खोलीत त्यांची चौकशी केली. या तपासादरम्यान एजन्सीने हाय-इंटेन्सिटी थ्री-डायमेंशनल (त्रिआयामी) कॅमेऱ्याच्या मदतीने संपूर्ण घर आणि परिसराचे ३६०-डिग्री रेकॉर्डिंग केले असून वैज्ञानिक पुरावे गोळा केले. काही तासांच्‍या चौकशीनंतर गिरिबाला सिंहला अटक करण्‍यात आली.

न्यायालयाने अटकपूर्व जामीन ठरवला होता अयोग्य

उच्च न्यायालयाने बुधवारी उशिरा रात्री जारी केलेल्या आपल्या आदेशात म्हटले होते की, प्रकरणाचे गांभीर्य, उपलब्ध पुरावे आणि तपासाची सद्यस्थिती पाहता आरोपींना दिलासा देणे योग्य ठरणार नाही. कनिष्ठ न्यायालयाने केस डायरी आणि उपलब्ध पुराव्यांचे योग्य परीक्षण केले नाही, असेही न्यायालयाने नमूद केले. याशिवाय, मृतदेहावर गळफासाशिवाय इतर जखमांच्या खुणाही आढळून आल्या असून, त्याचे कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरण आरोपींना देता आलेले नाही, असा उल्लेखही आदेशात करण्यात आला आहे.

ट्विशाचा पती कोठडीत

व्हॉट्सॲप चॅट्स आणि साक्षीदारांच्या जबाबावरून मानसिक छळ, गर्भपातासाठी दबाव आणि हुंड्याशी संबंधित आरोप समोर आले आहेत, असे न्यायालयाने म्हटले आहे. आरोपींनी तपासावर प्रभाव टाकण्याचा आणि मृत महिलेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेखही न्यायालयाने केला. या प्रकरणात आरोपी असलेला ट्विशा पती समर्थ सिंह याला न्यायालयाने २९ मे पर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. सीबीआय सध्या त्याची १२ मे च्या रात्री घडलेल्या घटना, घटनेनंतरच्या हालचाली आणि डिजिटल पुराव्यांबाबत चौकशी करत आहे.

१२ मे रोजी ट्विशाचा संशयास्पद मृत्यू

१२ मे रोजी रात्री भोपाळमधील कटारा हिल्स भागात द्विशा शर्माचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता. सासरच्या लोकांकडून हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे सांगितले जात आहे, तर दुसरीकडे माहेरच्या लोकांनी पती आणि सासरच्या मंडळींवर हत्या आणि छळाचे आरोप केले आहेत. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT