राष्ट्रीय

TV, AC, फ्रीज, वॉशिंग मशिन महागणार? १ ऑक्टोबरपासून इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या किमती ३ ते १० टक्क्यांपर्यंत वाढण्याचे संकेत

नवरात्र ते दिवाळी हा कंझ्युमर ड्युरेबल्स उद्योगासाठी महत्त्वाचा विक्रीचा कालावधी मानला जातो.

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात एसी, टीव्ही, फ्रीज किंवा वॉशिंग मशिन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना दरवाढीचा फटका बसण्याची शक्यता आहे. कॉपर, स्टील, ॲल्युमिनियम यांसारख्या कच्च्या मालाच्या किमतीतील वाढ, वाढता मालवाहतूक खर्च आणि रुपयाच्या विनिमय दरातील चढ-उतार यामुळे कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स आणि होम अप्लायन्सेस कंपन्या उत्पादनांच्या किमती वाढवण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. उद्योगातील माहितीनुसार, १ ऑक्टोबरपासून काही उत्पादनांच्या किमतीत ३ ते ८ टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते.

एसीच्या किमतीवर या दरवाढीचा सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता आहे. विविध ब्रँडच्या एसीच्या किमतीत ५ ते ८ टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते, तर काही प्रीमियम ब्रँडच्या उत्पादनांमध्ये वाढ १० टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एलईडी टीव्ही आणि वॉशिंग मशिनच्या किमतीत ३ ते ४ टक्के, तर रेफ्रिजरेटर आणि डीप फ्रीझरच्या किमतीत ३ ते ५ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, नवरात्र ते दिवाळी हा कंझ्युमर ड्युरेबल्स उद्योगासाठी महत्त्वाचा विक्रीचा कालावधी मानला जातो. या काळात कंपन्यांच्या वार्षिक विक्रीपैकी सुमारे ३० ते ४० टक्के विक्री होत असल्याचे उद्योगातील आकडेवारी सांगते. यंदाच्या सणासुदीच्या सुरुवातीच्या टप्प्यात एसी, फ्रीज आणि वॉशिंग मशिनच्या विक्रीत प्रमाणाच्या आधारावर १२ ते १५ टक्के, तर मूल्याच्या आधारावर १८ ते २३ टक्क्यांची वाढ झाल्याचे उत्पादकांचे म्हणणे आहे. त्यामुळे वाढत्या उत्पादन खर्चासोबतच ग्राहकांची खरेदीक्षमता आणि सणासुदीतील मागणी यांचा समतोल साधणे कंपन्यांसमोरचे महत्त्वाचे आव्हान ठरणार आहे.

जुना स्‍टॉक जुन्‍याच किमतीत

दरवाढीचा परिणाम ग्राहकांना लगेच जाणवेलच असे नाही. वितरक आणि किरकोळ विक्रेत्यांकडे जुन्या किमतीतील उत्पादनांचा साठा उपलब्ध असल्याने काही काळ ग्राहकांना जुन्या दरातच खरेदी करता येण्याची शक्यता आहे. कंपन्या आणि वितरकांनी ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये वाढीव उत्पादन खर्चाचा अंदाज घेत मोठ्या प्रमाणात साठा केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हा साठा संपेपर्यंत जुन्या किमतींचा लाभ मिळू शकतो. मात्र, दिवाळीनंतर हा साठा कमी झाल्यास नव्या किमतींचा परिणाम बाजारात अधिक स्पष्टपणे दिसण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT