Donald Trump
इजिप्त : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी इजिप्तमध्ये आयोजित गाझा शांतता शिखर परिषदेत भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भरभरून कौतुक केले. ट्रम्प यांनी भारताचा उल्लेख 'महान देश' असा केला, तर मोदींना 'माझे खूप चांगले मित्र' म्हटले. विशेष म्हणजे, ट्रम्प हे वक्तव्य करत असताना पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ त्यांच्या अगदी मागे उभे होते.
या परिषदेत बोलताना ट्रम्प म्हणाले की, "भारत एक महान देश आहे, ज्याच्या शीर्षस्थानी माझे एक खूप चांगले मित्र आहेत आणि त्यांनी शानदार काम केले आहे." यानंतर त्यांनी भारत आणि पाकिस्तानच्या संबंधांवर विश्वास व्यक्त करत म्हटले, "मला वाटते की पाकिस्तान आणि भारत एकत्र मिळून खूप चांगल्या प्रकारे राहतील."
बोलत असतानाच ट्रम्प यांनी मागे उभे असलेल्या पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याकडे वळून मिश्किलपणे विचारले, "बरोबर ना?" यावर शहबाज शरीफ यांनी मान हलवून 'हो' म्हणाले. ट्रम्प आणि शरीफ यांच्यातील या संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ट्रम्प यांना शांततेचे श्रेय
यावेळी ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या लष्करी नेतृत्वाची प्रशंसा केली आणि प्रादेशिक शांततेसाठी मित्रराष्ट्रांनी एकत्र काम करण्यावर भर दिला. ट्रम्प यांच्या निमंत्रणावरून पाकिस्तानी पंतप्रधान शरीफ यांनीही परिषदेला संबोधित केले. शरीफ यांनी भारत आणि पाकिस्तानमधील अणुयुद्ध टाळल्याबद्दल ट्रम्प यांना श्रेय दिले. ते म्हणाले, "या व्यक्तीने त्यांच्या टीमसह हस्तक्षेप केला नसता तर, दोन्ही अणू राष्ट्रांमधील युद्ध अशा स्तरावर वाढले असते की काय झाले हे सांगण्यासाठी कोणीही वाचले नसते."
भारताने या परिषदेत परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांना पंतप्रधान मोदींचे विशेष दूत म्हणून पाठवून आपली उपस्थिती नोंदवली. परराष्ट्र मंत्रालयाने गाझा शांतता कराराचे स्वागत केले असून, या क्षेत्रात कायमस्वरूपी शांतता नांदावी अशी आशा व्यक्त केली आहे.
मोदींकडून ट्रम्प यांच्या प्रयत्नांचे समर्थन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गाझा युद्धविराम योजना आणि शांतता प्रस्थापित करण्याच्या ट्रम्प यांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे. हमासच्या ताब्यात असलेल्या २० उर्वरित बंधकांना मुक्त करण्याच्या प्रक्रियेवर मोदींनी समाधान व्यक्त केले आणि ट्रम्प यांच्या शांतता प्रयत्नांना भारताचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. गाझा युद्धविराम करारावर ट्रम्प यांनी या परिषदेत जागतिक नेत्यांसोबत स्वाक्षरी केली. त्यांनी या दिवसाला मध्य-पूर्वेसाठी 'नवीन आणि सुंदर दिवस' असे म्हटले.