नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसमधील २० खासदार नॅशनलिस्ट सिटीजन पक्षात विलीन होणार आहेत. या विलीनीकरणानंतर आम्ही भाजपप्रणित एनडीएमध्ये सहभागी होऊ, असा दावा तृणमूलमधील बंडखोर खासदार काकोली घोष यांनी केला. बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. या भेटीनंतर काकोली घोष दस्तिदार माध्यमांशी बोलत होत्या. तत्पूर्वी ममता बॅनर्जी समर्थक खासदार कीर्ती आझाद, खासदार सागरिका घोष यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट देऊन निवेदन दिले.
दिल्लीत राजकीय रविवार आणि ३ बैठका
सर्वप्रथम तृणमूलमधील फुटीच्या चर्चांदरम्यान ममता बॅनर्जी समर्थक खासदार कीर्ती आझाद आणि सागरिका घोष यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना भेटून एक निवेदन दिले. यानंतर पक्ष अविभाज्य असून लोकसभेत स्वतंत्र गट स्थापन करण्याचा प्रयत्न संविधान आणि कायद्याच्या विरोधात असल्याचे सागरिका घोष म्हणाल्या. तसेच निवडणुकीत पक्षाचे चिन्ह, पक्ष नेतृत्व आणि संघटनेच्या बळावर विजय मिळवल्यानंतर पराभवानंतर त्याच पक्षाला आणि नेतृत्वाला सोडणे हे नैतिकदृष्ट्या कमकुवतपणाचे लक्षण आहे, अशी टीकाही सागरिका घोष यांनी केली.
ममता बॅनर्जी समर्थक खासदार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निवासस्थानी असताना बंडखोर खासदारांचा गट केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या निवासस्थानी होता. त्या ठिकाणी देखील एक बैठक पार पडली. याच बैठकीमध्ये पुढची रणनीती ठरली. या बैठकीनंतर बंडखोर गट लोकसभा अध्यक्षांच्या निवासस्थानी दाखल झाला. या गटाने लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. बंडखोर गटात २० खासदार उपस्थित होते. आणखी २ खासदार देखील त्यांच्यासोबत असल्याचे समजते.
आम्ही एनडीएसोबत जाणार: काकोली घोष
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतल्यानंतर बंडखोर खासदार काकोली घोष दस्तिदार म्हणाल्या की, तृणमूल काँग्रेसमधून निवडून आलेल्या २० खासदारांनी स्वतंत्रपणे बसण्याची परवानगी मागणारे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिले आहे. हे खासदार पक्षाच्या एकूण संख्याबळाच्या दोन-तृतीयांशपेक्षा अधिक आहेत. आम्ही नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टीमध्ये विलीनीकरण करत असून पुढे पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एनडीएसोबत देशहितासाठी काम करू, असेही त्या म्हणाल्या.