नवी दिल्ली : लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनकड, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अभिवादन केले. तसेच देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आदरांजली अर्पण केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मिडियावर आपल्या भावना व्यक्त करत भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले. पंतप्रधान म्हणाले की, “राष्ट्राची एकता आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करणे हे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनाचे सर्वोच्च प्राधान्य होते. त्यांचे व्यक्तिमत्व आणि कार्य देशातील प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील.”
संसदेतील संविधान सदनाच्या केंद्रीय कक्षात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी काँग्रेस नेते खा. अजय माकन, खा. जयराम रमेश, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा, भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी इंदिरा गांधींच्या स्मृतीस्थळी जाऊन इंदिरा गांधींना आदरांजली अर्पण केली. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस नेते उपस्थित होते. दरम्यान, सोशल मीडियावर व्यक्त होताना म्हणाले की, ‘पंडितजींची इंदू, बापूंची प्रियदर्शिनी, निर्भय, न्यायप्रिय - भारताच्या इंदिरा! देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी तुमचा त्याग आम्हा सर्वांना जनसेवेच्या मार्गावर नेहमीच प्रेरणा देत राहील.’