Rohini JEE exam success
तामिळनाडूतील आदिवासी समाजातील रोहिणीने जेईई परीक्षा उत्तीर्ण केली.  file photo
राष्ट्रीय

प्रेरणादायी..! आदिवासी विद्यार्थिनीने केली JEE मेन 'क्रॅक'

मोहन कारंडे

ती अशा कुटुंबात जन्‍माला आली जिथे राेजच जगणं हाच पराकाेटीचा संघर्ष हाेता... त्‍यामुळे शिक्षण आणि त्‍यापुढेही जावून उच्‍च शिक्षण मिळवणे हे तिच्‍यासाठी एक स्‍वप्‍नच हाेते... जेईई सारख्‍या राष्‍ट्रीय पातळीवरील सर्वात कठीण परीक्षेसाठी लाखाे रुपयांचे क्‍लास लावण्‍याची तिच्‍या पालकांची ऐपत नव्‍हती, मात्र परिस्थिती मात करण्‍याची जिद्द तिने साेडली नाही. अनेक अडचणींना तोंड देत आपल्‍या स्‍वप्‍नपूर्तीचा ध्‍यास तिने कायम ठेवला. अखेर तिची मेहनत फळाला आली. ती जेईई मुख्‍य परीक्षा उत्तीर्ण झाली. आता तिरुची येथील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत तिने प्रवेश घेतला आहे. ही वास्‍तवातील गाेष्‍ट आहे तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथील आदिवासी कन्‍या रोहिणीची. ६० वर्षांत 'एनआयटी'मध्ये प्रवेश मिळवणारी ती पहिली आदिवासी विद्यार्थिनी ठरली आहे.

पचमलाई हिल्स येथील एम रोहिणी (१८) ही राष्ट्रीय संस्थेत प्रवेश मिळवणारी जिल्ह्यातील पहिली आदिवासी मुलगी आहे. दररोज घरातील आणि शेतीची कामे पूर्ण करून ती अभ्यासासाठी वेळ काढत असे. जेईई मेनमध्ये रोहिणी ७३.८ टक्के गुण मिळवून तामिळनाडूतील २९ आदिवासी शाळांमध्ये अव्वल आली आहे. NEET, CLAT आणि JEE या सर्व परीक्षांमध्ये ती उत्तीर्ण झाली आहे. जॉइंट सीट अलोकेशन ऑथॉरिटीद्वारे तिला केमिकल इंजिनिअरिंगसाठी राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एनआयटी) तिरुची येथे शिक्षण घेण्याची संधी मिळाली आहे.

'एएनआय' या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रोहिणीने सांगितले की, "मी आदिवासी समाजातील विद्यार्थीनी आहे. आदिवासी सरकारी शाळेत शिकली आहे. मला जेईई परीक्षेत ७३.८ टक्के गुण मिळाले. मला एनआयटी तिरुचीमध्ये जागा मिळाली असून मी इंजिनिअरिंगची निवड केली आहे. तामिळनाडू राज्य सरकार माझी सर्व फी भरणार आहे, मला मदत केल्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानते. आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यांचेही मी आभार मानले," असे रोहीणीने म्हटले आहे.

SCROLL FOR NEXT