पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे मंगळवारी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या हल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार देशाचे गृहमंत्री अमित शहा त्या ठिकाणी पोहोचले आहेत. हा दहशतवादी हल्ला करणारी ही TRF संघटना आहे तरी काय? चला तर मग जाणून घेऊया हा संघटनेविषयी.
द रेजिस्टन्स फ्रंट (The Resistance Front - TRF) ही एक दहशतवादी संघटना आहे, जी लष्कर-ए-तैयबा (LeT) या कुख्यात पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचीच एक शाखा किंवा मुखवटा संघटना (front organization) मानली जाते.
TRF ची स्थापना 2019 मध्ये करण्यात आली होती, विशेषतः जम्मू-काश्मीरमधील अनुच्छेद 370 हटवल्यानंतर (ऑगस्ट 2019) ती अधिक सक्रिय झाली. TRF चा प्रमुख सज्जाद गुल आहे, जो पाकिस्तानमध्ये लपून बसला आहे. भारताच्या विरोधात, विशेषतः जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करणे हा या संघटनेचा उद्देश असून त्यांचे संबंध थेट पाकिस्तानातील लष्कर-ए-तैयबा आणि ISI (पाकिस्तानी गुप्तचर संस्था) यांच्याशी असल्याचे अनेक अहवालांनी दाखवले आहे.
TRF सारख्या संघटनांचा वापर आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाचे स्वरूप बदलवून दर्शवण्यासाठी केला जातो. म्हणजे हे हल्ले ‘स्थानिक असंतोषातून’ उद्भवले आहेत असा खोटा आभास निर्माण करणे, जेणेकरून पाकिस्तानची थेट भूमिका लपवता येईल.
टीआरएफचे दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये सक्रिय आहेत. या संघटनेला पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI कडून आर्थिक मदत मिळते. उपलब्ध माहितीनुसार, या संघटनेचे नेतृत्व सज्जाद गुल, सलीम रहमानी आणि साजिद जट करत आहेत. भारत सरकारने UAPA कायद्याअंतर्गत या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करून त्यावर बंदी घातली आहे.
2022 च्या वार्षिक अहवालात, जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या 90 हून अधिक मोहिमांमध्ये 42 विदेशी नागरिकांसह एकूण 172 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या दहशतवाद्यांपैकी बहुतांश (108) दहशतवादी द रेजिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) या संघटनांशी संबंधित होते. 2022 मध्ये विविध दहशतवादी संघटनांमध्ये 100 जण सामील झाले होते. यातील 74 जण हे पाकिस्तान समर्थित टीआरएफमध्ये सामील झाले होते.