पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे मंगळवारी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी निष्पाप नागरिकांना लक्ष्य केले. ज्यात 20 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्याची जबाबदारी ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (TRF) या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. टीआरएफ ही लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेची संलग्न संघटना आहे. पाकिस्तानमध्ये राहणारे शेख सज्जाद गुल हा टीआरएफचा प्रमुख आहे.
टीआरएफची कहाणी १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा हल्ल्यापासून सुरू होते. हळूहळू ही संघटना आपली ताकद वाढवू लागली आणि तिला गुप्तचर संस्था आयएसआयसह काही पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटनांचा पाठिंबा मिळाला. ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू आणि काश्मीरमधून कलम ३७० हटवताच, ही संघटना संपूर्ण काश्मीरमध्ये सक्रिय झाली.
टीआरएफच्या उदयाची खरी कहाणी पाकिस्तानपासून सुरू होते. वाढत्या दहशतवादी घटनांमुळे पाकिस्तानचा लपलेला चेहरा जगासमोर येऊ लागला. हळूहळू, पाकिस्तानवर त्यांच्या देशात वाढणाऱ्या दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव वाढत होता. पाकिस्तानला आता लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीन सारख्या संघटनांविरुद्ध काही कारवाई करावी लागेल हे समजले होते, परंतु यामुळे ते काश्मीरमधील आपले स्थान गमावू शकतात याची भीतीही त्यांना होती. अशा परिस्थितीत, पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय आणि लष्कर-ए-तैयबा यांनी मिळून 'द रेझिस्टन्स फ्रंट' या नवीन दहशतवादी संघटनेचा पाया रचला.