पुढारी ऑनलाईन डेस्क :
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सॅन्चेझ यांनी संयुक्तपणे आज (२८ ऑक्टोबर) रोजी गुजरातमधील वडोदरा येथील येथील टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेड या प्रकल्पात विमान निर्मिती प्रोजेक्टचे उद्घाटन केले. या प्राजेक्टमधून ‘एअरबस टाटा सी २९५’ या पहिल्या लष्करी वाहतूकीच्या विमानाची निर्मीती केली आहे.
टाटा व एअरबस या कंपन्यामध्ये संयुक्त पणे निर्मिती होणारे हे विमान भारताच्या हवाई वाहतूक उद्योगात क्रांतीकारी पाऊल ठरू शकते. वडोदरा येथील टाटांच्या प्रकल्पात एअरबस सी २९५ हे पहिले विमान तयार झाले आहे. हे पूर्णतः भारतीय बनावटीचे विमान आहे. ‘मेक इन इंडिया’ या अंतर्गत हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. हा प्रकल्प भारतासाठी ‘गेम चेंजर’ ठरणार आहे. भविष्यात या प्रकल्पातून तयार होणारी विमाने भारत निर्यात करु शकतो.
भारताच्या हवाईदलासाठी या नव्या विमानामुळे मोठा ‘बुस्टर’ ठरणार आहे. या विमानाच्या उपलब्धतेमुळेशत्रूराष्ट्रांविराधातील डावपेच अधिक प्रभावी होतील. अनेक हवाई मोहिमा राबविताना हे विमान उपयुक्त ठरणार आहे. लष्करी तळांवर सैन्यपथक पाठवणे, साहित्याची ने आण करणे, वैद्यकीय आणिबाणीवेळी तात्काळ मदत पोहचवणे तसेच हवाई गस्त घालण्यासाठी भारताच्या हवाईदलाला मोलाची मदत होणार आहे. हे विमान सध्या वापरात असलेल्या सोव्हिएत अन्टानोव्ह एएन -३२ आणि हिंदूस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या अर्वो ७४८ या विमानांची जागा घेईल.
या विमानाचा सर्वोच्च वेग हा ४८२ किलोमिटर प्रतितास असून यामधून ९ टन सामानासह ७१ सैनिक व ४८ पॅराट्रुपर्स एकाचवेळी ने आण होऊ शकते. यामुळे भारतीय हवाई दलाची कार्यक्षमता वाढणार आहे.
सी २९५ विमानाच्या निर्मीतीमुळे ‘मेक इन इंडिया’ व ‘आत्मनिर्भर भारत’ या उपक्रमांना गती मिळणार आहे. विमान निर्मिती क्षेत्रातील आयात तंत्रज्ञानावरील निर्भरता कमी होऊन देशातील तंत्रज्ञानाला चालना मिळणार आहे. या प्रकल्पामधून ५६ सी २९५ विमानांची निर्मिती करण्याचे लक्ष्य आहे. यातील पहिली १६ विमाने स्पेनमधील एअरबस प्रकल्पात निर्माण होणार असून त्यांनतरची विमाने वडोदरा येथील टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेड या प्रकल्पात तयार होतील. या प्रकल्पामुळे ३००० लोकांसाठी रोजगार निर्मिती होणार आहे.