पाटणा : बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यात रेल्वे रुळांवर बसून मोबाईलवर पबजी खेळण्यात मग्न असताना रेल्वेखाली चिरडून तीन मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे. नरकटियागंज-मुझफ्फरपूर रेल्वे सेक्शनवरील मानसा टोला येथील रॉयल स्कूलजवळ हा अपघात घडला.
या मुलांनी हेडफोन घातले होते आणि तिघेही पबजी खेळण्यात इतके गढून गेले होते की, त्यांना जवळ येणारी रेल्वेसुद्धा दिसली नाही. तशातच रेल्वेने त्यांना धडक दिली आणि तिघे जागीच ठार झाले. याची माहिती मिळताच घटनास्थळी प्रचंड गर्दी जमली. तीन मुलांच्या मृत्यूमुळे मानसा टोला भागावर शोककळा पसरली आहे.
फुरकान आलम, समीर आलम आणि हबीबा अन्सारी अशी या दुर्दैवी मुलांची नावे आहेत. पोलिसांनी मृतांच्या कुटुंबीयांचे जबाब घेण्याचा प्रयत्न केला. तथापि, त्यापैकी कोणीही बोलण्याच्या मनःस्थितीत नाही. ही मुले रेल्वेच्या रुळांवर बसून मोबाईलवर पबजी खेळत होती, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी पालकांना मुलांच्या हाती मोबाईल न देण्याचे आणि त्यांच्या सवयींवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे भविष्यात होणार्या अशा स्वरूपाच्या दुर्घटना टाळता येतील, असेही पोलिसांनी म्हटले आहे.