पुढारी ऑनलाईन डेस्क : छतीसगडमधील दंतेवाडा आणि बिजापूर जिल्ह्यांच्या सीमेवर आज (दि.२५) सकाळी झालेल्या चकमकीत २५ लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या टॉप कमांडरसह तीन नक्षलवादी ठार झाले. ( Encouter in chhattisgarh)
दंतेवाडा आणि बिजापूर जिल्ह्यांच्या सीमेवरील जंगलात सकाळी ८ वाजताच्या सुमारास सुरक्षा कर्मचाऱ्यांचे एक पथक नक्षलविरोधी कारवाईवर असताना चकमक सुरू झाली. या कारवाईसंदर्भात माहिती देताना दंतेवाडा पोलिस अधीक्षक (एसपी) गौरव राय म्हणाले की, दंतेवाडा आणि बिजा पूर जिल्ह्यांतील भागात नक्षलवाद्यांनी आश्रय घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी कारवाई सुरू केली होती. चकमकीनंतर शोध मोहिमेदरम्यान, टॉप कमांडर सुधीरसह तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह घटनास्थळावरून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
सुरक्षा दलांनी घटनास्थळावरुन INSAS रायफल, .303 रायफल, 12 बोर रायफल आणि इतर स्फोटके आणि वस्तू जप्त केल्या आहेत. एका नक्षलवादीची ओळख DKSZCM (दंडकर्ण्या स्पेशल झोनल कमिटी मेंबर) सुधीर उर्फ सुधाकर उर्फ मुरली अशी झाली. तो तेलंगणाच्या वारंगल जिल्ह्यातील रहिवासी आहे. इतर दोन नक्षली ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. आजूबाजूच्या परिसरात शोध सुरू आहे, अशी माहिती दंतेवाडा परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक कमलोचन कश्यप यांनी दिली.