आजपासून तंबाखू, सिगारेट महागणार Shailendra Bhojak
राष्ट्रीय

Tobacco tax : आजपासून तंबाखू, सिगारेट महागणार

नवीन कर श्रेणीची अंमलबजावणी; पानमसाल्यावर स्वतंत्र उपकर

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली ः सिगारेट, तंबाखू आणि पानमसाल्यासाठी एक फेब्रुवारीपासून अधिक कठोर कर प्रणाली लागू झाली आहे. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) श्रेणीतील सर्वोच्च कर आकारणी आरोग्यास हानिकारक पदार्थांवर केली जाणार आहे. अतिरिक्त उत्पादन शुल्क, आरोग्य व राष्ट्रीय सुरक्षेसाठी एक विशेष उपकर लागू करण्यात आला आहे.

सध्याचा 28 टक्के जीएसटी आणि नुकसानभरपाई उपकराऐवजी 40 टक्के जीएसटी तंबाखूजन्य पदार्थांवर लागू केला जाईल. सोबत तंबाखू उत्पादनांवर उत्पादन शुल्क आणि पान मसाल्यावर स्वतंत्र उपकर आकारला जाईल. सरकारने चघळण्याची तंबाखू, फिल्टर खैनी, जर्दा आणि गुटखा यांसारख्या तंबाखू उत्पादनांसाठी नवीन अधिकतम किरकोळ विक्री किंमत (एमआरपी) आधारित मूल्यांकन प्रणाली अधिसूचित केली आहे. एक फेब्रुवारीपासून या उत्पादनांवरील जीएसटीची गणना पॅकेजवर घोषित केलेल्या किरकोळ विक्री किमतीच्या आधारावर केली जाईल.

सिगारेटच्या लांबीनुसार प्रति सिगारेट 2.05 ते 8.50 रुपये कर लागू केला जाणार आहे. फिल्टर नसलेली 65 मिमी लांबीपर्यंतच्या एका सिगारेटवर 2.05 रुपये कर लागू होईल. तर लहान फिल्टर असलेल्या एका सिगारेटवर 2.10 रुपये कर लागू होईल. याशिवाय मध्यम आकाराच्या सिगारेटवर (65 ते 70 मिमी) 3.6 ते 4 रुपये प्रति सिगारेट आणि मोठ्या लांबीच्या सिगारेटवर (70 ते 75 मिमी) 5.4 रु. कर लागू होईल. तर या श्रेणीबाहेरील प्रत्येक सिगारेटवर 8.50 रु. कर लागू होईल. मात्र बहुतांश ब्रँड पहिल्या तीन श्रेणीत मोडतात. चघळायची तंबाखू, जर्दा, सेंटेड तंबाखूवर 82 टक्के आणि गुटख्यावर 91 टक्के कर लागू केला जाणार आहे. पान मसाल्यावर 88 टक्के उत्पादन शुल्क लागू केला जाणार आहे. मात्र नवीन उपकर उत्पादनाऐवजी उत्पादन क्षमतेच्या आधारावर लावला जाईल. जीएसटी परिषदेने सप्टेंबर 2025 मध्ये नुकसानभरपाई उपकर प्रणाली संपुष्टात आणली. त्यानंतर अतिरिक्त शुल्क आणि उपकर लावण्याची परवानगी दिली. त्यावर डिसेंबर महिन्यात संसदेने या नवीन करांना मंजुरी दिली.

पानमसाला उत्पादकांना कठोर नियम

पानमसाला उत्पादकांना आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर कायद्यांतर्गत नवीन नोंदणी करणे आवश्यक असेल. कठोर देखरेख नियमांचे पालन करावे लागेल. यामध्ये सर्व पॅकिंग मशिन झाकणाऱ्या कार्यरत सीसीटीव्ही प्रणाली बसवणे आणि त्याचे फुटेज किमान 24 महिन्यांसाठी जतन करणे यांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT