नवी दिल्ली: तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी संसदेच्या परिसरात गुरुवारी (दि.१८) रात्री १२ वाजल्यापासून ते शुक्रवारी (दि.१९) दुपारी १२ वाजेपर्यंत धरणे आंदोलन केले. सरकारवर मनमानी पद्धतीने विकसित भारत- जी राम जी विधेयक मंजूर करून महात्मा गांधी यांचा अपमान केल्याचा आरोप करत तृणमूल काँग्रेसचे खासदार रात्रभर आंदोलन केले. जुन्या संसद भवनाच्या पायऱ्यांवर हे धरणे आंदोलन करण्यात आले.
संसदेने "विकसित भारत - जी राम जी विधेयक, २०२५" मंजूर केले. हे विधेयक प्रथम लोकसभेने आणि नंतर रात्री राज्यसभेने मंजूर केले. हे विधेयक महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) ची जागा घेते. संसदेत विधेयक मंजूर झाल्यानंतर लगेचच तृणमूल काँग्रेसचे खासदार धरणे आंदोलनावर बसले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी इतर विरोधी पक्षांचे खासदार तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले आणि त्यांच्यासोबत धरणे आंदोलनावर बसले. सरकार बुलडोझर युक्त्या वापरत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी केला.
विरोधकांनी हे विधेयक स्थायी किंवा संयुक्त समितीकडे पाठवण्याची मागणी केली होती, परंतु सरकारने ते मंजूर केले. तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी महात्मा गांधी आणि गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचे फोटो असलेले एक मोठे बॅनर लावून आंदोलन केले. जसे महात्मा गांधी यांना मारले तसे मनरेगाला मारू नका, असे घोषवाक्य बॅनरवर लिहिले होते. यावेळी त्यांनी नारेबाजी देखील केली. सरकारने महात्मा गांधी आणि रविंद्रनाथ टागोर यांचा अपमान केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी केला.