राष्ट्रीय

Tirupati laddoo row : धक्कादायक! तिरुपती देवस्थानात २० कोटी लाडूंसाठी वापरले 'भेसळयुक्त' तूप

तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) ट्रस्ट बोर्डाचे अध्यक्ष बीआर नायडू यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

Tirupati laddoo row: तिरुपती मंदिरात भेसळयुक्त तूप वापरून अंदाजे २० कोटी लाडू तयार करण्यात आले होते. २०१९-२०२४ दरम्यान वाटण्यात आलेल्या एकूण ४८.७६ कोटी लाडूंपैकी हे लाडू होते, अशी माहिती श्री वेंकटेश्वर मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) ट्रस्ट बोर्डाचे अध्यक्ष बीआर नायडू यांनी दिली आहे. ही आकडेवारी २०१९ ते २०२४ दरम्यान वाटण्यात आलेल्या प्रसादाच्‍या एकूण ४८७.६ दशलक्ष लाडूंपैकी २० कोटी लाडू हे भेसळयुक्‍त तुपाचा वापर करुन बनवले होते, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

एसआयटीने केली टीटीडीचे माजी अध्‍यक्षांची चौकशी

मंदिरात दररोज येणाऱ्या भाविकांची संख्या, खरेदीची माहिती आणि उत्पादन आणि विक्रीचे आकडे यांचा विचार करून साध्या गणनेच्या आधारे हे आकडे काढण्यात आले आहेत. एसआयटीने अलीकडेच या प्रकरणासंदर्भात टीटीडीचे माजी अध्यक्ष आणि वायएसआरसीपी खासदार वायव्ही सुब्बा रेड्डी यांची आठ तास चौकशी केली. प्रयोगशाळेने नमुन्यांमध्ये भेसळ आढळून आली असूनही त्यांनी तूपाच्या टँकरना परवानगी का दिली असे विचारले असता, त्यांनी दावा केला की अहवाल त्यांच्यासमोर कधीही सादर करण्यात आला नाही. खरेदी तांत्रिक समितीच्या शिफारशींनुसार केली गेली.त्यांचे माजी सहाय्यक चिन्ना अप्पाना यांना अटक करण्यात आली आहे.

१५ डिसेंबरपर्यंत पुरवणी आरोपपत्र सादर होण्याची अपेक्षा

एसआयटीने टीटीडीचे माजी कार्यकारी अधिकारी एव्ही धर्मा रेड्डी यांचीही चौकशी केली आहे. नेल्लोर येथील न्यायालयात त्यांनी आपले महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे, १५ डिसेंबरपर्यंत पुरवणी आरोपपत्र सादर होण्याची अपेक्षा आहे. दरम्‍यान, सूत्रांनी असे म्हटले आहे की, या पाच वर्षांत अंदाजे ११ कोटी भाविकांनी मंदिराला भेट दिली होती. मात्र भेसळयुक्त तुपापासून बनवलेले लाडू नेमके कोणी घेतले हे निश्चित करण्याचा कोणताही मार्ग नाही. तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) ट्रस्ट बोर्डाचे स्‍पष्‍ट केले आहे की, व्हीव्हीआयपी लाडू देखील वेगळे ओळखता येत नव्हते.

सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिले एसआयटी चौकशीचे आदेश

आंध्र प्रदेशातील तिरुमला श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिरात भाविकांना प्रसाद म्हणून अर्पण केलेल्या प्रसिद्ध तिरुपती लाडूमध्ये कथित भेसळ प्रकार मागील वर्षी उघडकीस आला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. लाखो लोकांच्या श्रद्धेशी संबंधित या प्रकरणाचा राजकारण केले जाऊ नये, असे निरीक्षण नोंदवत सर्वोच्‍च न्‍यायालयाने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते.

लाडूसाठी २५० कोटी रुपये किमतीचे ६८ लाख किलो भेसळयुक्त तूप

या प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथक (एसआयटी) करत आहे. एसआयटीला असे आढळून आले आहे की, सुमारे २५० कोटी रुपये किमतीचे ६८ लाख किलो भेसळयुक्त तूप ज्यामध्ये पाम तेल, पाम कर्नल तेल आणि इतर विषारी पदार्थ मिसळले गेले होते - हे उत्तराखंडच्या भोले बाबा डेअरी आणि त्यांच्या शेल कंपन्यांनी पुरवले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT