Tirupati Laddu Adulteration Pudhari
राष्ट्रीय

Tirupati Laddu Adulteration Case: तिरुपती बालाजीच्या लाडू प्रसादातील भेसळप्रकरणी ईडीची मोठी कारवाई; १२९.८५ कोटींची मालमत्ता जप्त

बनावट तुपाच्या पुरवठ्याचा आरोप; डेअरी कंपन्या आणि प्रवर्तकांच्या मालमत्तांवर टाच, सहा राज्यांतील १६ ठिकाणी छापे

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली: तिरुमला तिरुपती देवस्थानमधला पवित्र लाडू प्रसादासाठी बनावट व भेसळयुक्त तुपाचा पुरवठा केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने मोठी कारवाई केली आहे. या आर्थिक गैरव्यवहार (मनी लाँड्रिंग) प्रकरणात तपास यंत्रणेने विविध डेअरी कंपन्या आणि त्यांच्या प्रवर्तकांची १२९.८५ कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे.

'पीएमएलए' कायद्यांतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईत 'भोले बाबा ऑरगॅनिक डेअरीमिल्क', 'श्री वैष्णवी डेअरी', 'सुकृती फुड्स' या कंपन्या आणि त्यांचे प्रवर्तक विपिन जैन, पोमिल जैन तसेच कैलाश चंद मंगला यांच्या मालमत्तांचा समावेश आहे. 'ईडी'ने यापूर्वीच मुख्य सूत्रधार विपिन जैन आणि कैलाश मंगला यांना अटक केली आहे.

पामतेल आणि रसायनांचा वापर

'ईडी'च्या आरोपानुसार, भोले बाबा आणि सुकृती फुड्सच्या कारखान्यांमध्ये रिफाइंड पामतेल, पाम कर्नेल तेल आणि पामोलिनमध्ये मोनो-ग्लिसराइड्स, ॲसिटिक ॲसिड एस्टर, लॅक्टिक ॲसिड आणि बीटा-कॅरोटीनसारखी रसायने मिसळून बनावट तूप तयार केले जात होते.

देशव्यापी छापे आणि पुढील कारवाई

या प्रकरणात आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, उत्तराखंड, तामिळनाडू, दिल्ली आणि राजस्थान अशा ६ राज्यांतील १६ ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. या कारवाईमुळे सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या एका मोठ्या आर्थिक आणि गुन्हेगारी कटकारस्थानाचा पर्दाफाश झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT